कोरोनामुळे पती गमावलेल्या १५ महिलांची प्रकरणे मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:25 IST2021-06-17T04:25:02+5:302021-06-17T04:25:02+5:30
धुळे : कोरोनामुळे एक पालक गमावलेल्या मुलांची संख्या ३०१ तर दोन्ही पालक गमावलेल्या मुलांची संख्या २० झाली आहे. दरम्यान, ...

कोरोनामुळे पती गमावलेल्या १५ महिलांची प्रकरणे मंजूर
धुळे : कोरोनामुळे एक पालक गमावलेल्या मुलांची संख्या ३०१ तर दोन्ही पालक गमावलेल्या मुलांची संख्या २० झाली आहे. दरम्यान, कोरोनामुळे पती गमावलेल्या १५ महिलांची निराधार योजना वेतन अनुदानाची प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत, अशी माहिती सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत देण्यात आली.
कोरोनामुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती तातडीने उपलब्ध करून देत त्यांचा अहवाल सादर करावा, असे निर्देश कृती दलाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत. कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांच्या काळजीसाठी गठित जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी दुपारी झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डॉ. डी.यू. डोंगरे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक बी. एम. मोहन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भडांगे, तहसीलदार गायत्री सैंदाणे (धुळे ग्रामीण), सुनील सैंदाणे (शिंदखेडा), आबा महाजन (शिरपूर), अपर तहसीलदार संजय शिंदे (धुळे), सुचेता चव्हाण (संगांयो), जिल्हा प्रशासन अधिकारी पल्लवी शिरसाट, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हेमंतराव भदाणे, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी चव्हाण, जिल्हा परिविक्षा अधिकारी एम. एम. बागूल, निरीक्षण गृहाच्या अधीक्षिका अर्चना पाटील, जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष ॲड. अमित दुसाने आदी उपस्थित होते.
कोविडमुळे एक किंवा दोन पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांप्रती संवेदनशील राहून त्यांच्या गरजा समजून घ्याव्यात. त्यांना आवश्यकतेप्रमाणे शालेय साहित्य, गणवेश उपलब्ध करून देतानाच संस्था चालकांशी शैक्षणिक शुल्कमाफीसंदर्भात संवाद साधत अशा विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावावेत. तसेच तालुका पातळीवरून या कुटुंबांच्या संपर्कात राहून त्यांना वेळोवेळी मदत करावी. महिला आर्थिक विकास महामंडळ आणि ग्रामीण विकास यंत्रणेने एक पालक गमावलेल्या कुटुंबातील महिलांना बचत गटांमध्ये सामावून घ्यावे. तसेच त्यांना आवश्यकतेप्रमाणे कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून द्यावे. महानगरपालिका, नगरपालिकेने आपल्यास्तरावरून आढावा घेत या कुटुंबांना मदत उपलब्ध करून द्यावी.
एक पालक गमावलेल्या कुटुंबातील महिलांना संजय गांधी निराधार योजनेसह शासकीय योजनांचे लाभ तातडीने मिळवून द्यावेत. त्यासाठी आवश्यक प्रक्रिया आठवडाभरात पूर्ण करावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले. त्यानुसार धुळे शहरातील तीनपैकी एक, तर धुळे ग्रामीण तहसील कार्यक्षेत्रातील २१ पैकी १४ महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले असून, त्यांना लवकरच लाभ मिळण्यास सुरुवात होईल. याशिवाय उर्वरित प्रकरणांच्या मंजुरीसाठी कार्यवाही जलदगतीने करण्यात येईल, असे यावेळी तहसीलदार सुचेता चव्हाण, गायत्री सैंदाणे यांनी सांगितले.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी भदाणे यांनी सांगितले, एक पालक गमावलेल्या बालकांची संख्या ३०१, तर दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या २० झाली आहे. अन्य बालकांची माहिती संकलनाचे काम सुरू आहे.
बालकांसाठी हेल्पलाइन
दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना काही समस्या असल्यास त्यांनी चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक १०९८, ८३०८९-९२२२२ या क्रमांकांवर सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत संपर्क करावा.
सामाजिक संस्थांना आवाहन
कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचे शिक्षण, पुनर्वसन आणि मदतीसाठी धुळे जिल्ह्यातील सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था आणि दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, धुळे, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी, ५२, जयहिंद कॉलनी, सुधा हॉस्पिटलसमोर, देवपूर, धुळे तसेच अध्यक्ष, सदस्य, बालकल्याण समिती, धुळे, मुलांचे निरीक्षणगृह, बालगृह, साक्री रोड, धुळे येथे संपर्क साधावा.