उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 21:48 IST2020-06-15T21:47:43+5:302020-06-15T21:48:06+5:30

जिल्हाधिकारी : संपर्कातील व्यक्तींची तपासणी मोहिमे राबविण्याचे आदेश

Appoint a specialist doctor for treatment | उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करा

dhule

धुळे : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे़ बाधितांच्या संपर्कातील नागरिकांची तपासणी मोहिम राबविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत़
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी सकाळी झालेल्या प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेच्या आढावा बैठकीत त्यांनी हे आदेश दिले़ भविष्यात रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने निर्माण होणाºया परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आतापासूनच उपाययोजना करीत आठवडाभरात साधनसामग्री, मनुष्यबळ उपलब्ध करण्याचे निर्देशही त्यांनी दिले़
धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी काही रुग्णांच्या प्राथमिक तपासणीत त्यांना कोरोनाबरोबरच अन्य विकार असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे कोरोनासह अन्य आजार असलेल्या रुग्णांवर औषधोपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करावी. तसेच या रुग्णांच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली समित गठित करून तत्काळ अहवाल सादर करावा, असे आदेश त्यांनी दिले़
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, बाधित रुग्णांची संख्या चारशेच्यावर पोहोचली आहे. अशा परिस्थितीत आरोग्य विभागाने दक्षता बाळगत सतर्क रहावे़ बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांवर लक्ष ठेवावे. धुळे शहरासह ग्रामीण भागात तपासणी मोहीम व्यापक स्वरुपात राबवावी. त्यासाठी पथकांची संख्या वाढवावी. आवश्यक तेथे खासगी डॉक्टर आणि पोलिसांचेही सहकार्य घ्यावे. तसेच चाचण्यांचे प्रमाणही वाढवावे. महानगरपालिका आणि साक्री येथे स्वॅब घेण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. मोबाईल रुग्ण वाहिकेच्या माध्यमातून ५० वर्षावरील व्यक्तींची सरसकट आरोग्य तपासणी करून घ्यावी, असेही त्यांनी निर्देश दिले.
महानगरपालिका आणि नगरपालिकास्तरावर कोरोना ‘वॉर रूम’ तयार करून त्याचा दैनंदिन आढावा घ्यावा. कोरोना विषाणूचे रुग्ण वाढी मागील कारणांचा सखोल शोध घेत वॉररूममध्ये चर्चा करून शास्त्रीय दृष्टिकोनातून उपाययोजना करावी. भारतीय वैद्यकीय परिषदेने आगामी काळात रुग्ण वाढीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर डेडिकेटेड कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर आणि डेडिकेटेड कोविड हेल्थ हॉस्पिटलचे आतापासूनच नियोजन करावे. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची भरती प्रक्रिया आठवडाभरात पूर्ण करावी. तसेच साधनसामग्रीची खरेदी करावी. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले़
या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद भदाणे, उपजिल्हाधिकारी तथा कोरोना समन्वयक श्रीकुमार चिंचकर, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, डॉ. विक्रम बांदल, मनपा उपायुक्त गणेश गिरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवचंद्र सांगळे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. मनीष पाटील, कोरोनाचे जिल्हा नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील उपस्थित होते.
आवाहन आजार लपवू नका
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी आजार लपवू नये. हा आजार लपविल्याने आणि शेवटच्या टप्प्यात उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोरोना विषाणूची प्रारंभिक लक्षणे दिसताच जवळच्या रुग्णालयात जावून तपासणी करून घ्यावी. तसेच प्रत्येक नागरिकाने आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करून घ्यावे, असेही आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले आहे़

Web Title: Appoint a specialist doctor for treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे