संकुचित विचार सोडून सामंजस्य राखले तर देशाचा सर्वांगीण विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 16:01 IST2018-09-02T15:58:54+5:302018-09-02T16:01:07+5:30
शरद पवार : धुळ्यात महापालिका इमारत लोकार्पण प्रसंगी प्रतिपादन

संकुचित विचार सोडून सामंजस्य राखले तर देशाचा सर्वांगीण विकास
लोकमत आॅनलाईन
धुळे : देशात संकुचित, मर्यादीत विचार वाढत आहे. तो विकासासाठी घातक आहे. देशात विविध जाती-धर्माचे लोक राहतात. त्या सर्वांमध्ये सामंजस्य निर्माण करण्याची काळजी घेतली पाहीजे. तसे झाले तर या सर्वांच्या एकजुटीतून शक्ती निर्माण होईल. त्याच्यातून देशाचा सर्वांगिण विकास होईल, असे मत राष्टÑवादी कॉँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी धुळ्यात मांडले.
धुळे महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन रविवारी माजी केंद्रीय मंत्री व खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास आमदार अमरिशभाई पटेल, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार कुणाल पाटील, आमदार डी.एस. अहिरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर कल्पना महाले, आयुक्त सुधाकर देशमुख, काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, महानगर अध्यक्ष युवराज करनकाळ, राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, महानगर अध्यक्ष मनोज मोरे यांच्यासह मनपाचे पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी शरद पवार म्हणाले की, देशाच्या सर्वात प्रभावी प्रधानमंत्री कोण असे विचारले तर इंदिरा गांधी असे एकच उत्तर येते. एक महिलेला शक्ती दिली तर ती काय करु शकते, हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणता येईल. त्यांनी जगात देशाचा नावलौकीक वाढविला. त्यामुळे भगिनींना संधी देणे ही तुमची व माझी जबाबदारी आहे. मी राज्यात असतांना महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांत ५० टक्के आरक्षण देण्याचा आणि वडिलोपार्जित मालमत्तेत मुलाएवढाच मुलीचाही हक्क असावा, हे दोन निर्णय घेतले होते. हा कायदा झाल्याने चित्र बदलले आणि धुळ्याला आतापर्यंत तीन महिला महापौर मिळाल्यात, असेही पवार म्हणाले.
विकासासाठी सर्वांनी एकत्र या
विकासाबाबत धुळे अद्याप मागे का, याचा साकल्याने विचार करण्याची गरज आहे. निवडणुकांनंतर केवळ विरोधासाठी विरोध नको. तर शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येत चर्चा व प्रयत्न करावेत, असा सल्लाही शरद पवार यांनी यावेळी बोलताना दिला. तसे झाले तर धुळ्याचा झपाट्याने विकास होईल. यासाठी त्यांनी पुण्यानजीकच्या पिंपरी शहराचे उदाहरण दिले. आज या शहराचा आदर्श पुणे शहराने ठेवावा, असे म्हटले जाते. देशाच्या मध्यातून जाणारा मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग येथून जाणार आहे. शहराच्या औद्योगिकरणासाठी येथे मोठे उद्योग कसे येतील, याचा विचार करा. तुमच्या विकासाच्या कामांसाठी मदत लागल्यास मी त्यासाठी तत्पर आहे, असे शरद पवारांनी स्पष्ट केले.