दुचाकी अपघातात आनोरेची महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 21:42 IST2020-12-06T21:42:32+5:302020-12-06T21:42:53+5:30
पारोळा रोडवरील उड्डाणपुलाखाली घटना

दुचाकी अपघातात आनोरेची महिला ठार
धुळे : शहरातील पारोळा रोडवरील उड्डाणपुलाखाली दोन दुचाकींचा अपघात झाला. या अपघातात अमळनेर तालुक्यातील आनोरे येथील महिला ठार झाली. कोकीळा मोरे असे या मृत महिलेचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पारोळा रोड चौफुलीवरील उड्डाण पुलाखालून मोटारसायकल भरधाव वेगाने निघाली होती. त्याचवेळेस अन्य एक मोटारसायकलवरुन कोकीळा मोरे (४२) आणि त्यांचे पती रमेश मोरे (४५) हे जात होते. भरधाव वेगातील मोटारसायकल मोरे यांच्या दुचाकीवर आदळली. त्यामुळे मोरे दाम्पत्य फेकले गेले. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु होण्यापुर्वीच कोकीळा मोरे यांचा मृत्यू झाला. अपघाताच्या या घटनेनंतर जबाबदार असणारा अन्य दुसरा दुचाकीस्वार पळून जाण्यात यशस्वी ठरला. याप्रकरणी भाऊसाहेब ताराचंद मिस्तरी (मोरे) (रा. आनोरे ता. अमळनेर) यांनी आझादनगर पोलीस ठाण्यात ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फिर्याद दाखल केली. त्यानुसार, विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस हेड कॉन्स्टेबल एस. के. सूर्यवंशी घटनेचा तपास करीत आहेत.