महापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:43 IST2021-09-10T04:43:00+5:302021-09-10T04:43:00+5:30
येथील महापालिकेच्या प्रथम सत्रातील महापौरांची अडीच वर्षांची मुदत ३० जून रोजी संपली होती. पुढच्या अडीच वर्षासाठी महापौर निवडला जाणार ...

महापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर
येथील महापालिकेच्या प्रथम सत्रातील महापौरांची अडीच वर्षांची मुदत ३० जून रोजी संपली होती. पुढच्या अडीच वर्षासाठी महापौर निवडला जाणार आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम १९ (१) च्या तरतुदीला अनुसरून तसेच नाशिक विभागाचे आयुक्त यांच्याकडील पत्रानुसार शुक्रवार १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेची महासभा आयोजित करण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या नगरसेवकांची विशेष बैठक जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या स्व. भारतरत्न डॉ. अटलबिहारी वाजपेयी सभागृहात ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. महापौर निवडीच्या कार्यक्रमानुसार ११ ते १३ सप्टेंबर या काळात सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत महापौरपदासाठी नामनिर्देशनपत्र घेता येईल. घेतलेले नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची वेळ १३ सप्टेंबर रोजी सकाळी सकाळी ११ ते दुपारी २ ही देण्यात आलेली आहे. नगरसचिव हे पत्र स्वीकारतील. दाखल झालेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी १७ सप्टेंंबर रोजी विशेष सभेचे कामकाज सुरू असताना केली जाईल. छाननीनंतर १५ मिनिटांचा कालावधी माघारीसाठी देण्यात आलेला आहे. त्यानंतर आवश्यकता भासल्यास महापौरपदासाठी निवडणूक घेण्यात येईल.
दोन नावांची अधिक चर्चा
महापौरपदासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असले तरी सध्यातरी दोन नावांची जोरदार चर्चा महापालिकेच्या आवारात सुरू आहे. त्यात नगरसेवक प्रदीप कर्पे आणि नगरसेविका प्रतिभा चौधरी यांचा समावेश आहे. या दोन नावांच्या चर्चेत विद्यमान महापौर चंद्रकांत सोनार यांचे चिरंजीव देवेंद्र सोनार यांचेही नाव समोर येत आहे. या तिघांमध्ये कोणाची वर्णी लागते; अथवा दुसऱ्याच कोणाचे नाव समोर येते, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.