संतप्त शेतकऱ्यांनी पशुवैद्यकीय दवाखान्याला ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:36 IST2021-04-27T04:36:31+5:302021-04-27T04:36:31+5:30
दुसाणे येथे जिल्हा परिषदेचा श्रेणी-२ चा पशुवैद्यकीय दवाखाना आहे. या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यासह अनेक पदे मंजूर असली तरी गेल्या ...

संतप्त शेतकऱ्यांनी पशुवैद्यकीय दवाखान्याला ठोकले कुलूप
दुसाणे येथे जिल्हा परिषदेचा श्रेणी-२ चा पशुवैद्यकीय दवाखाना आहे. या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यासह अनेक पदे मंजूर असली तरी गेल्या काही महिन्यांपासून येथे पशुवैद्यकीय अधिकारी व शिपाई कार्यरत आहेत; मात्र गेल्या सहा महिन्यांपासून पशुवैद्यकीय अधिकारी एम.पी.पाटील हे दवाखान्यात आलेलेच नाहीत; परंतु पशुवैद्यकीय दवाखाना बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना व पशुपालन करणाऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यात वाढत्या तापमानामुळे गुरांवर साथीचे रोग पसरतात. यांवर उपचार घेण्यासाठी शेतकऱ्यांना खासगी उपचाराचा पर्याय निवडावा लागतो व त्यात त्यांचा पैसा खर्च होतो. दुसाणे गावात जवळपास तीन वर्षांपासून या लसीकरणसंदर्भात कोणतीच उपाययोजना झालेली नाही, असे दूध व्यावसायिक दीपक खैरनार यांनी सांगितले.
पशुवैद्यकीय अधिकारी येत नसल्याने, संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी या दवाखान्यालाच कुलूप ठोकले. यावेळी दवाखान्यात उपस्थित असलेले शिपाई विशाल अहिरे यांना घरचा रस्ता दाखवला. पशुवैद्यकीय वैद्यकीय अधिकारी दोन दिवसात दुसाण्यात हजर झाले नाहीत तर त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, या संदर्भात पंचायत समिती साक्री येथे व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊ, असा इशारादेखील दिलेला आहे. यावेळी दीपक खैरनार, अरुण भदाणे, दिनेश पवार,नरेश महाले यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.