पाण्याची मोटार सुरू केल्याचा राग, एकावर लोखंडी पावडीने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 21:10 IST2020-11-14T21:10:16+5:302020-11-14T21:10:39+5:30
साक्री तालुक्यातील दरीपाडा शिवारात घडली घटना

पाण्याची मोटार सुरू केल्याचा राग, एकावर लोखंडी पावडीने हल्ला
धुळे : विहिरातील पाण्याची मोटार सुरू केल्याचा राग आल्याने तिघांनी एका प्रौढाला मारहाण केली. ही घटना साक्री तालुक्यातील दरीपाडा शिवारात घडली. यात लोखंडाच्या पावडीचा वापर झाल्याने जखमी झालेल्या इसमाला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्ह्याची नोंद झाली. साक्री तालुक्यातील डांगशिरवाडे शिवारातील दरीपाडा येथे सुभाष महारू शिंदे यांचे (५०) यांचे शेत आहे. कांद्याचे पीक त्यांनी आपल्या शेतात घेतले आहे. त्या पिकाला पाणी देण्यासाठी त्यांनी विहिरीतील पाण्याची इलेक्ट्रिल मोटार सुरू केली. परिणामी कांद्याच्या पिकाला पाणी देण्यास सुरुवात झाली. ही मोटार सुरू केल्याचे वाईट वाटल्याने तीन जण त्याठिकाणी आले. त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यातील एकाने तर लोखंडाची पावडीच उचलली आणि उजव्या पायाच्या गुडघ्याच्या खाली मारल्याने गंभीर दुखापत झाली. अन्य दोघांनी शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडला. यानंतर जखमी अवस्थेत सुभाष शिंदे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी सुभाष शिंदे यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात १३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली. त्यानुसार, अविनाश महारू शिंदे, शिवाजी राजू शिंदे, छोटू महारू शिंदे (सर्व रा. दरीपाडा पोस्ट डांगशिरवाडे, ता. साक्री) यांच्या विरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला. घटनेचा तपास हेड कॉन्स्टेबल शिरसाठ करीत आहे.