श्रीराम मंदिर भूमिपूजनदिनी होणार आनंदोत्सव साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 10:05 PM2020-08-04T22:05:44+5:302020-08-04T22:06:24+5:30

घरोघरी रांगोळ्या काढाव्या, आरती आणि दीपोत्सव साजरा करण्याचे आवाहन

Anandotsav will be celebrated on Shri Ram Mandir Bhumi Pujan Day | श्रीराम मंदिर भूमिपूजनदिनी होणार आनंदोत्सव साजरा

श्रीराम मंदिर भूमिपूजनदिनी होणार आनंदोत्सव साजरा

Next

धुळे - प्रभु श्रीराम यांची जन्मभूमी अयोध्या येथे ५ आॅगस्ट रोजी श्रीराम मंदिर बांधकामाचे भूमिपूजन होत आहे. यानिमित्त शहरातील विविध मंदिरावर रोषणाई करण्यात आली आहे. तसेच बुधवारी दुपारी १२ वाजता महानगरपालिकेसमोरील गुरुशिष्य स्मारकाजवळ प्रभु श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे. तसेच आग्र रोडवरील श्रीराम मंदिरात आरती आणि लाडूचे वाटप होईल़ तसेच सायंकाळी शहरात दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. नागरिकांनी घरासमोर रांगोळी काढून दुपारी घरात आरती करावी तसेच सायंकाळी दीप प्रज्वलीत करुन आनंदोत्सव साजरा करावा, असे आवाहन भाजप महानगर जिल्हाध्यक्ष अनूप अग्रवाल यांच्यासह विविध हिंदूत्ववादी संघटनांनी केला आहे.
शहरातील मंदिरांना रोषणाई : शहरातील पांझरा नदीकाठावरील श्री कालिकादेवी मंदिर, श्री पंचमुखी हनुमान मंदिर, श्री सिद्धेश्वर मंदिर, श्री नारायणबुवा समाधी मंदिर, खोलगल्लीतील श्रीराम मंदिरावर मंगळवारी सायंकाळीच रोषणाई करण्यात आली होती.
महाआरती व पूजन : शहरातील महापालिकेसमोरील गुरुशिष्य स्मारकाजवळील भाजप महानगर जिल्हाध्यक्ष कार्यालयासमोर ५ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजता महाआरती आणि प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर भाजप महानगरतर्फे १९९२ मध्ये अयोध्येला कारसेवा करणाऱ्या कारसेवकांचे त्यांच्या घरीपूजन भाजपतर्फे सत्कार करण्यात येणार आहे.
विहिंपतर्फे प्रसाद वाटप : श्रीराम मंदिराच्या बांधकामांच्या भूमिपूजन निमित्त अयोध्यात कार्यक्रम होत असताना धुळ्यातील आग्रा रोडवर श्रीराम मंदिरात विश्व हिंदू परिषदेच्यावतीने बुधवारी दुपारी १२ वाजता आरती होणार आहे़ त्यानंतर भाविकांना प्रसाद म्हणून लाडू वाटप करण्यात येईल अशी माहिती विंहिपचे महानगरमंत्री मनोज जैन यांनी दिली़

पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया

धुळेकर नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग ठेऊन ५ आॅगस्ट रोजी घरावर भगवा ध्वज लावावा. तसेच घरासमोर रांगोळी काढावी. तसेच दुपारी १२ वाजता घरातच आरती करावी. सायंकाळी दीप लावून आनंदोत्सव साजरा करावा़
- अनूप अग्रवाल
महानगर जिल्हाध्यक्ष, भाजप धुळे

राम मंदिराचा भूमिपुजन सोहळा पंतप्रधान आणि साधू-संत व महात्मांच्या उपस्थितीत होत आहे, याचा मनस्वी आनंद आहे़ संपूर्ण भारतात सामाजिक सदभाव निर्माण झाला आहे़ कार्यक्रमाचे औचित्यसाधून घरोघरी रांगोळ्या काढाव्यात़ सायंकाळी दीपोत्सव साजरा करुया़
- सुरेंद्र काकडे
शहर कार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, धुळे

प्रभु श्रीरामचंद्रजींचे भव्य असे मंदिर उभारण्याची संकल्पपूर्ती पूर्ण होत आहे़ यामुळे आनंद आहे़ ५ आॅगस्ट रोजी प्रत्येक भारतीयाने आपले घरी दिवे लावून एक प्रकारे दिवाळी साजरी करावी़ आम्हाला राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा बघण्याचे सौभाग्य लाभले, परिणामी जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटते़ विश्व हिंदू परिषदेची एक तपाची मागणी पूर्णत्वास आली आहे़ हा आनंद गगनात मावेनासा झाला आहे़
- मनोज जैन
विश्व हिंदू परिषद, महानगरमंत्री, धुळे

अयोध्यात रामाच्या मंदिराचे भूमिपूूजन होत असल्याने खूपच आनंद झाला आहे़ अयोध्या येथे सेवा करण्याचे भाग्य लाभले नाही़ परंतु रामाच्या मंदिराचे भूमिपूजन सोहळा बघण्याचे सौभाग्य लाभले़ या जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटते़ आनंद प्रचंड होत आहे की अक्षरश: डोळ्यातून पाणी येत आहे़
- गुलाब माळी
बजरंग दल, महानगर संयोजक, धुळे

Web Title: Anandotsav will be celebrated on Shri Ram Mandir Bhumi Pujan Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे