अमरावती प्रकल्प अद्यापही तहानलेलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:43 IST2021-09-08T04:43:04+5:302021-09-08T04:43:04+5:30

मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्पामध्ये अत्यल्प म्हणजे फक्त २८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मोठी चिंतेची बाव निर्माण झाली ...

The Amravati project is still thirsty | अमरावती प्रकल्प अद्यापही तहानलेलाच

अमरावती प्रकल्प अद्यापही तहानलेलाच

मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्पामध्ये अत्यल्प म्हणजे फक्त २८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मोठी चिंतेची बाव निर्माण झाली आहे. शनिमांडळ, ऐचाळे, खर्दे, इंदवे, हट्टी डोंगर रांगेत असलेल्या अमरावती धरणात केवळ २८ टक्केच जलसाठा शिल्लक राहिला आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास धरण कोरडे होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचे संकट उभे राहून शेती पुन्हा कोरडवाहू होणार आहे.

अमरावती व नाई नदीवरील संगमावर पर्यटनस्थळाच्या वरील बाजूस धुळे-नंदुरबार जिल्ह्याच्या सिमेवर अमरावती धरण बांधण्यात आले आहे. त्याकाळी या नद्यांना बारमाही पाणी असायचे. सध्या या नद्या कोरड्या आहेत. पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्यास धरण भरते हे दोन वर्षाच्या अनुभवावरून सिद्ध झाले आहे. नैसर्गिक परिस्थिती बघता परिसराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे हे धरण आहे. ज्याच्यामुळे परिसरात पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होते. पावसाळ्यात अमरावती व नाई नदीला मोठा पूर येतो. मात्र, यावर्षी पावसाळा हा अत्यल्प स्वरूपाचा होत असल्यामुळे धरणात अद्याप जलसाठा झालेला नाही. यामुळे धरण पूर्ण क्षमतेने अद्यापपर्यंत भरलेले नाही. गेल्या दोन महिन्यापासून पावसाने पाठ फिरविल्याने धरण कोरडे होण्याच्या मार्गावर आहे. दिवसेंदिवस पाण्याच्या पातळीत घट होत चालली आहे. जोरदार पाऊस झाल्याशिवाय धरण भरणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

अशीच परिस्थिती तालुक्यातील वाडी शेवाडी धरणाची झालेली आहे. या सर्व सिंचन प्रकल्पांची पाण्याची पातळी कमी होत आहे. मालपूरसह तालुक्यात गेल्या आठवड्यात पाऊस होवून धरणे अद्यापपर्यंत निम्मेसुध्दा भरलेली नाहीत. मुसळधार पाऊस न झाल्यास येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यातील या मध्यम प्रकल्पात ५० टक्केही पाणीसाठा जमा झालेला नाही. विशेषत: बहुतांश सर्व प्रकल्प कोरडेच आहेत. मालपूरसह परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या मालपूर धरणाची पाण्याची उपयुक्त क्षमता ६.७६ दशलक्ष घनमीटर असताना आतापर्यंत या पावसाळ्यात हे धरण २८ टक्के पाण्याने भरले आहे. या धरणाची सर्वोत्तम पाणीपातळी २२५.७० मीटर असल्याचे सांगितले जाते.

पावसाने पुन्हा दडी मारली आणि शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या. त्यानंतर पुन्हा पावसाची कृपादृष्टी झाली. मात्र त्यानंतर पावसाने दांडी मारल्यामुळे पिके कोमजू लागली होती. पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटली होती अशावेळी येथून आवर्तन सोडण्यात आले होते. त्यानंतर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. मात्र रब्बी हंगामातील पिकांसाठी विहिरींना पाणी असणे गरजेचे आहे. आगामी काही दिवसात अजून दमदार पाऊस झाला तरच विहिरींनाही पाणी येईल. अन्यथा त्याचा परिणाम रब्बीच्या हंगामावर होऊ शकतो.

Web Title: The Amravati project is still thirsty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.