रस्त्यांच्या दुरवस्थेत आरोपांचा धुराळा; देवपुरातील रस्त्यांच्या मार्गात गटारींचा खड्डा!रस्त्यांवर साचले पाणी आणि चिखल; चाकरमान्यांसह विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:39 IST2021-08-22T04:39:05+5:302021-08-22T04:39:05+5:30
धुळे : येथील देवपुरातील वाडीभोकर रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. भूमिगत गटार योजनेसाठी या रस्त्यासह देवपुराच्या काॅलनी ...

रस्त्यांच्या दुरवस्थेत आरोपांचा धुराळा; देवपुरातील रस्त्यांच्या मार्गात गटारींचा खड्डा!रस्त्यांवर साचले पाणी आणि चिखल; चाकरमान्यांसह विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय
धुळे : येथील देवपुरातील वाडीभोकर रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. भूमिगत गटार योजनेसाठी या रस्त्यासह देवपुराच्या काॅलनी परिसरातील रस्ते खोदले, पण त्यानंतर त्यांची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे देवपुरातील रहिवासी वैतागले आहेत. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे आरोपांचा धुराळा उडत आहे.
देवपुरातील रहिवाशांसह शिवसेना देखील आक्रमक आहे. वेळोवेळी आंदोलन करुन, निवेदने देऊन देखील दखल घेतली जात नसल्याने महानगरपालिकेतील सत्ताधारी आणि ठेकेदारांचे अर्थपूर्ण संबंध असल्याचा गंभीर आरोप रहिवाशांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. रस्त्यांसाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
भूमिगत गटार योजनेच्या कामामुळे वाडीभोकर रस्त्यासह देवपुरातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. महानगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला वेळोवेळी निवेदने दिली, आंदोलन केले; परंतु दखल घेतली नाही. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचे आणि ठेकेदाराचे अर्थपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे ठेकेदाराला पाठीशी घातले जात आहे. शहरातील शिवसैनिक हा प्रकार खपवून घेणार नाहीत. संबंधितांना वठणीवर आणण्यासाठी तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडले जाईल. - हिलाल माळी, जिल्हाप्रमुख, शिवसेना
देवपुरात सर्वाधिक रहदारी असलेल्या वाडीभोकर रस्त्याला काॅलेज रोड म्हणूनही ओळखले जाते. शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची दिवसभर वर्दळ असते. सर्वाधिक गैरसोय विद्यार्थी-विद्यार्थिनींची होत आहे. अपघात होऊन एखाद्याचा प्राण जाऊ शकतो, इतका हा रस्ता घातक झाला आहे. देवपुरातील रस्त्यांवर पाणी, चिखल साचल्याने आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम त्वरित करावे, अशी आमची मागणी आहे.
- राज कोळी, महानगर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस
सुरत-नागपूर महामार्गाचे काम होणार वर्षभरात पूर्ण
सुरत-नागपूर (सुरत-कोलकात्ता) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ (पूर्वीचा क्रमांक ६) चे गेल्या पाच वर्षांपासून रखडलेले चाैपदरीकरणाचे काम वर्षभरात म्हणजे नाेव्हेंबर २०२२ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक रवींद्र इंगोले यांनी दिली. या महामार्गाच्या चाैपदरीकरणाचे काम शासनाने मुंबईच्या आयएल ॲण्ड एफएस या कंपनीला दिले होते. परंतु या कंपनीने गुजरातच्या जीएचव्ही कंपनीला उपठेकेदार नेमले. दोन्ही कंपनीतील वाद तसेच कंपन्या अवसायनात गेल्याने रस्त्याचे काम रखडल्याचे सांगितले जाते, परंतु आता पनवेल येथील जे. एम. म्हात्रे कंपनीला काम देण्यात आले. या कंपनीने चाैपदरीकरणाच्या कामाला गती दिल्याने वर्षभरात काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. सुरत-नागपूर महामार्ग चाैपदरीकरणाचे धुळे जिल्ह्यात ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. अजंग, ता. धुळे ते नवापूर जि. नंदुरबारपर्यंत १४० किलोमीटरपैकी सुमारे ८० किलोमीटर रस्ता तयार झाला आहे. उर्वरित काम वर्षभरात पूर्ण करण्याचे एनएचएआय आणि म्हात्रे कंपनीचे नियोजन आहे.