धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:30 IST2021-01-14T04:30:09+5:302021-01-14T04:30:09+5:30
धुळे : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के झाले आहे. जिल्ह्यात चारही तालुके मिळून दररोज ...

धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल
धुळे : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के झाले आहे. जिल्ह्यात चारही तालुके मिळून दररोज रुग्ण आढळून येण्याच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. धुळे शहर व तालुक्यात पाच ते सहा रुग्ण आढळत आहेत. उर्वरित तालुक्यात एक किंवा दोनच रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे धुुळे जिल्ह्याची हळूहळू कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याची माहिती जिल्हा कोरोना नोडल अधिकारी डाॅ. विशाल पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
जिल्ह्यात मंगळवारी ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या फक्त १४८ होती. तर एकूण २१ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले होते. त्याआधी रविवारी तर केवळ २ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले होते. बुधवारी सायंकाळी फक्त ७ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पाॅझिटिव्ह आढळून येणाऱ्या रुग्णांपेक्षा जास्त आहे. हळूहळू ते शंभर टक्के होईल, अशी अपेक्षा आरोग्य विभागातर्फे व्यक्त करण्यात आली आहे. एकूणच आता धुळे जिल्हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत आहे.
संपूर्ण जिल्हाच कोरोनामुक्तीकडे
जिल्ह्यात पाॅझिटिव्ह आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या दररोज कमी कमी होत चालली आहे. त्याऐवजी बरे होणाऱ्या रुग्णांचा रिकव्हरी रेट हा ९७ टक्केपर्यंत पोहोचला असल्याने संपूर्ण जिल्हाच कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत आहे.