आयटकचा किसान मुक्ती दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 22:08 IST2020-08-10T22:08:26+5:302020-08-10T22:08:44+5:30
विविध मागण्या : पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

dhule
धुळे : भाकप प्रणित अखिल भारतीय ट्रेड युनियन कौन्सिल अर्थात आयटकने ९ आॅगस्ट क्रांतीदिनी ‘भारत बचाओ’ आणि ‘किसान मुक्ती दिन’ पाळून प्रंतप्रधानांसह मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे़
निवेदनात म्हटले आहे की, कोरोनामुळे लागु केलेल्या लॉकडाऊनमध्ये कामगार, कष्टकरी, स्थलांतरीत मजुर, व्यावसायिक, शेतकरी हे सर्व घटक अडचणीत सापडले आहेत़ असे असताना केंद्र तसेच राज्य सरकारने त्यांना आर्थिक मदत केली नाही़ लॉकडाऊन काळात कामगारांना वेतन द्यावे, कामगार कपात करु नये असे आदेश असताना बहुसंख्य उद्योगांनी कायम, कंत्राटी आणि हंगामी कामगारांना वेतन दिले नाही़ याउलट कामावरुन काढून बेरोजगारीमध्ये भर घातली आहे़ रोजगार बंद झालेल्या कामगार, कष्टकरी, स्थलांतरीत कामगारांना व गरजूंना सरकारी गोदामात प्रचंड धान्यसाठा असताना वेळेवर पुरेसे अन्नधान्य मिळाले नाही़ त्यामुळे श्रमीक व गरीबांना उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे़ विशेषत: स्थलांतरीत कामगारांचे प्रचंड हाल झाले़ अनेकांचा अपघाती मृत्यू झाला़ कामगारांचे वेतन, आरोग्य सुरक्षा, सामाजिक सुरक्षा, मानवी प्रतिष्ठा या सर्वांवर हल्ला केला जात आहे़ या महामारीत शेतकरी पुर्णपणे हवालदील झाला आहे़ या हल्ल्याच्या विरोधात ९ आॅगस्टला केंद्रीय कामगार संघटनांनी देशभर निदर्शने केली़ कामगार कायदे रद्द करुन नये, कामगारांना वेतन द्यावे, आयकर लागू नसलेल्या कुटूंबांना साडेसात हजार रुपये मदत द्यावी यासह इतर मागण्या करण्यात आल्या़ निवेदनावर हिरालाल सापे, हिरालाल परदेशी, पोपटराव चौधरी, वसंत पाटील, साहेबराव पाटील, गुलाबराव पाटील, रमेश पारोळेकर, अशोक बाविस्कर, एल़ आऱ राव, प्रशांत वाणी, राजेंद्र चौरे, दिपक सोनवणे, शरद पाटील, प्रमोद सिसोदे, आसीफ शेख, जावीद मिर्झा आदींच्या सह्या आहेत़