आहिराणीला भाषेचा दर्जा अन् जनगणनेत मातृभाषा रकाना टाकावा : खान्देश साहित्य संघाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:40 IST2021-09-12T04:40:59+5:302021-09-12T04:40:59+5:30
याबाबत खान्देश साहित्य संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री तसेच मंत्रिमंडळातील विविध मंत्र्यांना निवेदन देण्यात आले. आहिराणी भाषा समृद्धी ...

आहिराणीला भाषेचा दर्जा अन् जनगणनेत मातृभाषा रकाना टाकावा : खान्देश साहित्य संघाची मागणी
याबाबत खान्देश साहित्य संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री तसेच मंत्रिमंडळातील विविध मंत्र्यांना निवेदन देण्यात आले. आहिराणी भाषा समृद्धी व संवर्धनासंदर्भात अपेक्षा व्यक्त केली आहे. अनेक वर्षांपासून सतत मागणी केली जात असून नुकतेच शासनाला स्मरणपत्र देण्यात आले.
याविषयी अध्यक्ष डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांनी सांगितले की, आहिराणी भाषा ही अभिरांची प्राचीन भाषा असून इ. स. पूर्व ३००० पासून याबाबत पुरावे आढळतात. धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये ९५ टक्के लोकसंख्या आहिराणी व तिच्या उपभाषा बोलणारी आहे. राज्यासह देशभारत स्थलांतरित झालेल्या कुटुंबांचा विचार केला तर दोन कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या आहिराणी भाषिकांची असून या भाषेच्या १२ उपभाषा आहेत.
मागण्या अशा...
आहिराणी भाषेचा संविधानातील आठव्या अनुसूचित समावेश करावा व प्रमाण भाषेचा दर्जा द्यावा, कवयित्री बहिणाबाई चाैधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे आहिराणीचे अध्ययन केंद्र व स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू करावा, नवीन शैक्षणिक धोरणात प्राथमिक शिक्षण आहिराणी व तत्सम बोलीभाषेत देण्याची तरतूद करवी, प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणात आहिराणीचा २५ टक्के अभ्यासक्रम असावा, आहिराणी साहित्याचा शासनाद्वारा दिल्या जाणाऱ्या पुरस्कारात व संमेलनात समावेश करावा, अक्षय तृतीया सणाला आहिराणी लोकवाङ्मय दिवस म्हणून मान्यता मिळावी, खान्देशातील साहित्यिक, लोककलावंत तथा ग्रंथोत्सव व साहित्यिक उपक्रमांसाठी धुळे शहरात खान्देश सांस्कृतिक भवनासाठी जागा मिळावी आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत.
निवेदन देताना खान्देश साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. सदाशिव सूर्यवंशी, सचिव कवी रमेश बोरसे, कवयित्री रत्नमाला पाटील, कवी गोकुळ पाटील, कवी कमलेश शिंदे, मधुकर काकुळदे, प्रा. रमेश राठोड, प्रा. अशोक शिंदे नवापूर, हेमलता पाटील नंदुरबार, विष्णू जोंधळे शहादा, विवेक पाटील मालेगाव, विजय निकम चाळीसगाव, जितेंद्र चौधरी पुणे, शाहीर श्रावण वाणी धुळे, ज्योती राणे जळगाव, सचिन देशमुख पारोळा, हेमंत निकम पारोळा, डॉ. कुणल पवार अमळनेर, ॲड. डी. एन. पिसोळकर धुळे, राजेंद्र सोनवणे धुळे, अजबसिंग गिरासे शहादा, मधुकर पवार चाळीसगाव, के. बी. लोहार शिरपूर, बी. व्ही. श्रीराम शिरपूर, ज्ञानेश्वर भामरे शिरपूर आदी उपस्थित होते.