परीक्षा पुढे ढकलल्याच्या निषेधार्थ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:05 IST2021-03-13T05:05:19+5:302021-03-13T05:05:19+5:30
धुळे : महाराष्ट्र सरकारने राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने धुळ्यातील सावरकर पुतळ्याजवळ आंदोलन ...

परीक्षा पुढे ढकलल्याच्या निषेधार्थ आंदोलन
धुळे : महाराष्ट्र सरकारने राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने धुळ्यातील सावरकर पुतळ्याजवळ आंदोलन करत सरकारविरोधी घोषणा दिल्या. येत्या १४ मार्च रोजी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा होणार होती. त्यासाठी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी जोरदार तयारी केली होती. परीक्षा तीन दिवसांवर आली असतानाच राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे कारण देत ही परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा केली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
यापूर्वीही ही परीक्षा चारवेळा स्थगित करण्यात आली आहे. राज्यात शाळा, महाविद्यालये सुरू आहेत तसेच विविध प्रकारच्या परीक्षाही घेतल्या जात आहेत. मग महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षाच का होत नाही, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थी शासनाने ठरवलेल्या वयोमर्यादेत बसणार नाहीत. त्यामुळे भविष्यात ते परीक्षेपासून वंचित राहू शकतात. त्यामुळे शासनाने हा निर्णय मागे घ्यावा, वेळेत परीक्षा घ्याव्यात, यासाठी ‘अभाविप’तर्फे शुक्रवारी सकाळी सावरकर पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘अभाविप’चे शहर मंत्री भावेश भदाणे, आदिती कुळकर्णी, वैष्णवी मराठे, आदिनाथ कोठावदे, निशांत शिंदे, चेतन अहिरराव, अविनाश उखंडे, महेश पाटील, महेश निकम, आदी उपस्थित होते. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी येत कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या.