अखेर पन्नास वर्षानंतर निघाल्या वीजतारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 22:40 IST2019-10-04T22:39:53+5:302019-10-04T22:40:10+5:30
बंद पडलेल्या वीजतारा : धोका टळला ; बांधकामासाठी मार्ग मोकळा, ‘लोकमत’ चे मानले आभार

dhule
धुळे : तब्बल पन्नास वर्षांपासून बंद पडलेल्या उच्चदाब वीजतारांखाली धोकेदायक परिस्थितीत वास्तव्याला असलेल्या नागरिकांना अखेर न्याय मिळाला, महावितरणने ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत साक्रीरोड परिसरातील वीजतारा काढण्यास सुरूवात केलीे़ त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
अवधान औद्योगिक वसाहतीला वीज पुरवठा करण्यासाठी साक्रीरोड ते गुरूद्वारापर्यत वीज तारा टाकण्यात आल्या आहेत. त्या घराच्या अगदी हाताच्या अंतरावर असल्याने दुमजली बांधकामांचा मार्ग बंद झाला होता़ काहींनी जागेअभावी स्वत:चे घर विकून स्थलांतर केले होते़ मात्र तब्बल पन्नास वर्षानंतर या अडचणीच्या तारा काढण्यात येत असल्याने अनेकांच्या चेहऱ्यांवर आनंद दिसत आहे़
दहा कर्मचारी नियुक्त
येथील वीजतारा काढण्यासाठी अधिकाऱ्यांनी बुधवारी सर्वेक्षण केले होते़ त्यानुसार गुरूवारी वीजतारा काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे़ त्यासाठी दहा ते बारा कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे़ महिनाअखेर हे काम पूर्ण होणार आहे़
सोळा वर्षानंतर का होईना अखेर ‘तिला’ न्याय मिळाला.....
जोरावर अली सोसायटी येथील घराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर टाकलेल्या स्लॅबवर पाणी टाकण्यासाठी पत्नी आशाबाई पिंपळे (वय ३७ ) छतावर गेली़ त्याठिकाणी पडलेली लोखंडाची सळई दुसºया ठिकाणी टाकण्यासाठी तिने हातात घेतली, मात्र डोक्यावर उच्चदाब वीज तारा असल्याने ती तारांकडे ओढली गेली़ त्यामुळे तिचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला़ क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं, महावितरण कंपनीच्या अधिकाºयांकडे तक्रार देखील केल्या होत्या, मात्र काहीही उपयोग झाला नाही़ सोमवारी ‘लोकमत’च्या वृत्ताची अधिकाºयांनी दखल घेतली आणि गुरूवारी त्या वीजतारा काढण्यात आल्या. तब्बल १६ वर्षानंतर का होईना अखेर पत्नीस न्याय मिळाला़ - अशोक पिंपळे