तक्रारीनंतर बुराई नदीवरील पाटण साठवण बंधारा दुरुस्ती काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:54 IST2021-02-23T04:54:03+5:302021-02-23T04:54:03+5:30
शिंदखेडा येथील पाटण क्र. १ हा जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत ९९ लक्ष रु. खर्चातून बंधारा बांधण्यात आला आहे. या ...

तक्रारीनंतर बुराई नदीवरील पाटण साठवण बंधारा दुरुस्ती काम सुरू
शिंदखेडा येथील पाटण क्र. १ हा जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत ९९ लक्ष रु. खर्चातून बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधाऱ्यामुळे पाटण व शिंदखेडा शहरातील शेत जमीन सिंचनाखाली येणार होती. तसेच पिण्याचा पाण्याचा देखील प्रश्न मार्गी लागणार होता. मात्र पहिल्याच पावसात बंधाऱ्याच्या साईड भराव वाहून गेला. काँक्रीट कामालादेखील मोठे तडे गेले आहेत. यामुळे मागील दोन वर्षांत एक टक्का देखील पाणी साठवणूक झाली नाही. ठेकेदार व संबंधित विभागाचे अभियंता यांच्या हलगर्जीपणामुळे शासनाचे लाखो रु. पाण्यात गेले. तसेच सदर बंधाऱ्यात अनेक उणिवा असल्याचे निदर्शनास येत आहे. साठवण बंधाऱ्याच्या कामात ठेकेदाराने अटी व शर्ती उल्लंघन केल्याचे आढळून येते. ५ वर्ष देखभाल व दुरुस्ती करणे ठेकेदाराची जबाबदारी असतांना मागील दोन वर्षात एकदा देखील दुरुस्ती करण्यात आलेली नाही.
या संदर्भात धनराज व्ही. निकम व योगेश चौधरी यांनी मंत्रालयात व्हिडिओ फुटेज व पुरावे सादर करून तक्रार दाखल केली. नियमित पाठपुरावा केला. वरिष्ठ स्तरावर दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आली. सदर तक्रारीची दखल घेऊन स्थानिक प्रशासनाला बंधाऱ्यांची चौकशी करून बंधारा दुरुस्तीचे आदेश देण्यात आल्याने बंधारा दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. बंधाऱ्याचे काम गुणवत्ता पूर्ण करण्यात यावे व एसआयटी चौकशी होऊन दोषींवर कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी तक्रारदार धनराज निकम व योगेश चौधरी यांनी केली आहे.