खाद्यपदार्थ विकणाऱ्यावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 20:44 IST2020-03-29T20:44:05+5:302020-03-29T20:44:59+5:30
संचारबंदी : महापालिकेच्या पथकाची धाड, पोलिसात केली तक्रार

खाद्यपदार्थ विकणाऱ्यावर कारवाई
धुळे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे़ तरी देखील कोणतीही परवानगी न घेता साक्री रोडवर हातगाडीलावून खाद्यपदार्थ विक्री करणे, एकाला चांगलेच महागात पडले आहे़ त्या विक्रेत्याला महापालिकेच्या पथकाने रविवारी सकाळी रंगेहात पकडले. भरत शितलदास लखवानी याच्याविरूद्ध धुळे शहर पोलीस स्टेशनला कारवाईची प्रक्रिया सायंकाळी सुरू होती.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलेले आहे़ त्यात अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे़ उर्वरीत सर्वांना आपला व्यवसाय बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी पारीत केलेला आहे़ भाजी विक्रेत्यांना परवानगी देण्यात आलेली असून त्यांना महापालिकेकडून पासेस वितरीत करण्यात आलेले आहेत़ इतर व्यवसायिकांना कोणतीही परवानगी दिलेली नाही़
अशी स्थिती असताना साक्री रोडवरील कुमारनगर भागात एका हातगाडीवर खाद्यपदार्थ विक्री सुरू असल्याची माहिती महापालिका प्रशासनाला मिळाली़ माहिती मिळताच तातडीने महापालिकेचे प्रसाद जाधव यांच्या पथकाने धाड टाकली़ या विक्रेत्याकडे कोणत्याही प्रकारची परवानगी नव्हती़ तरीदेखील तो व्यवसाय करताना आढळून आला़ त्यामुळे शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होते़