जिल्ह्यात पाच रेशन दुकानांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 21:44 IST2020-07-13T21:44:35+5:302020-07-13T21:44:55+5:30

जिल्हा पुरवठा अधिकारी : एक परवाना कायमस्वरुपी रद्द

Action on five ration shops in the district | जिल्ह्यात पाच रेशन दुकानांवर कारवाई

dhule

धुळे : जिल्ह्यातील पाच रेशन दुकानांवर कारवाई केल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांनी दिली़ एका दुकानाचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला आहे तर चार दुकानांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे़
तपासणीकामी पुरवठा यंत्रणेस स्वस्त धान्य दुकानाचे अभिलेख उपलब्ध न करुन देणे, पुरवठा कर्मचारी व ग्राहक यांच्याशी उद्धटपणे बोलणे या कारणावरून शिरपूर शहरातील अरुणा बापू थोरात यांच्या दुकानाचा परवाना (क्रमांक १९१) कायमस्वरुपी रद्द केला आहे. या दुकानातून लाभार्थ्यांना युनीटप्रमाणे धान्य वितरीत केले नसल्याच्या तक्रारी होत्या़ यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी काढलेल्या नोटीसला देखील उत्तर दिले नाही.
साक्री तालुक्यातील पेटले येथील रास्त भाव दुकान क्रमांक १५१ या दुकानाचा परवाना जुलै ते सप्टेबर असे तीन महिन्यांसाठी निलंबीत केला आहे़ ग्राहकांना पावत्या न देणे, तांदुळ व गहू कमी प्रमाणात वाटप करण्याच्या कारणावरुन ही कारवाई केली आहे़ याच कारणांमुळे शिरपूर तालुक्यातील अभाणपूर रास्त भाव दुकान क्रमांक १२८, साक्री तालुक्यातील सुतारे दुकान क्रमांक २१०, महिर दुकान क्रमांक ११३ या स्वस्त धान्य दुकानांचे परवाने एका महिन्यासाठी निलंबीत करण्यात आले आहेत.
स्वस्त धान्य दुकानदारांनी सर्व योजनांचे धान्य मुदतीत वाटप करावे़ तसेच स्वस्त धान्य दुकानातुन कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही़ गैरव्यवहार करणाऱ्यांविरुध्द कडक करावाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांनी दिला आहे़
कोरोनामुळे लॉकडाऊन केल्यापासून जिल्ह्यात रेशन दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत आहे़ मापात पाप करणाऱ्यांवर वेळोवेळी कारवाईचा बडगा उगारला जात आहे़

Web Title: Action on five ration shops in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे