एकरी उतारा घटला, कापसाच्या भावाचा फुगाही फुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:39 IST2021-09-27T04:39:44+5:302021-09-27T04:39:44+5:30
शिंदखेडा तालुक्यात कापूस हे प्रमुख पीक आहे. बागाईतदार शेतकरी मे महिन्यातच विहिरीच्या पाण्यावर कापसाची लागवड करतात. यंदा विहिरींना ...

एकरी उतारा घटला, कापसाच्या भावाचा फुगाही फुटला
शिंदखेडा तालुक्यात कापूस हे प्रमुख पीक आहे. बागाईतदार शेतकरी मे महिन्यातच विहिरीच्या पाण्यावर कापसाची लागवड करतात. यंदा विहिरींना चांगले पाणी असल्याने शेतकऱ्यांनी जास्त क्षेत्रात सरकी पेरली. जून, जुलै आणि ऑगस्टच्या वीस तारखेपर्यंत पावसाने ओढ घेतल्याने सर्व तालुक्यात पिकांची वाढ खुंटली.
याच काळात काही शेतकऱ्यांना दुबार, तर काहींना तीन वेळा पेरणी करावी लागली. त्यावर कीटकनाशक आणि पीकवाढीची फवारणी यामध्ये शेतकरी पूर्ण हैराण झाले आहेत. मजुरांनादेखील यंदा काम मिळाले नाही. परिणामी, ग्रामीण भागातील दळणवळण ठप्प झाले आहे.
व्यापारी वर्गाने कापूस खरेदीला आठ, नऊ हजार रुपये भाव दिला होता; पण प्रत्यक्षात शेतकऱ्याचा कापूस विक्रीला आला तेव्हा मात्र तीन, चार हजार रुपये भाव दिला जात आहे. एकीकडे निसर्गाने घात केला आणि दुसरीकडे व्यापारीही भाव देत नाही. या पार्श्वभूमीवर शासनाने कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरू करून बळीराजाला सहकार्य करावे, अशी मागणी होत आहे.