वाहन चोरणाऱ्या चोरट्यासह साथीदारही जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 22:08 IST2021-01-14T22:07:37+5:302021-01-14T22:08:00+5:30
मोहाडी पोलीस : एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत

वाहन चोरणाऱ्या चोरट्यासह साथीदारही जाळ्यात
धुळे : मोहाडी उपनगरातील रिलायन्स टॉवरजवळून चोरून नेण्यात आलेली पिकअप वाहन शोधून काढत दोघा सराईत गुन्हेगारांना पकडून अटक करण्यात मोहाडी पोलिसांना यश आले आहे. जप्त केलेली गाडी ही एक लाख रुपये किमतीची आहे. ३ जानेवारी रोजी मोहाडी उपनगरातील रिलायन्स टॉवरजवळील लोहार कॉम्प्लेक्स येथील दुकानासमोर फारुख हाजी लतीफ मेमन (रा. हजार खोली, मुस्लिम नगर, धुळे) या व्यापाऱ्याच्या मालकीची एमएच १८ एए ४७७५ क्रमांकाची पिकअप गाडी लावलेली होती. ४ जानेवारी रोजी सकाळी फारुख मेमन यांचा मुलगा जावेद हा दुकानावर गेला तेव्हा पिकअप गाडी त्याला दिसून आली नाही. ही गाडी चोरीला गेल्याचे समोर आले असता याप्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली.
मोहाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली असता ३ जानेवारी रोजी रिलायन्स टॉवरजवळील काटेरी झुडपात आसीफ शेख मोहम्मद हनीफ (रा. शंभर फुटी रोड, धुळे) हा आपल्या साथीदारांसोबत काहीतरी नशा करीत असून, त्याने पिकअप गाडी चोरून नेल्याची गोपनीय माहिती राजगुरू यांना मिळाली. त्यानुसार सापळा लावण्यात आला. पथक तयार करून त्याचा शोध घेण्यात आला. आसीफ शेख मोहम्मद हनीफ याला पकडण्यात आले. त्याच्यासोबत त्याचे जे साथीदार होते, त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांच्या ताब्यातील एक लाख रुपये किमतीची पिकअप गाडीदेखील हस्तगत करण्यात आली. हनीफ आणि त्याचा साथीदार यांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योेगेश राजगुरू आणि त्यांच्या पथकातील उपनिरीक्षक मुस्तफा मिर्झा, पोलीस कर्मचारी प्रभाकर ब्राह्मणे, तुषार जाधव, अब्दुल्ला शेख, धीरज गवते, गणेश भामरे, सचिन वाघ, जितेंद्र वाघ, अजय दाभाडे, कांतीलाल शिरसाठ यांनी केली. घटनेचा तपास पोलीस कर्मचारी तुषार जाधव करीत आहेत.