अक्कलपाडा पाणी योजनेच्या कामाला गती, वन विभागाचा अडसर दूर; जलवाहिनीच्या कामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:34 IST2021-03-24T04:34:03+5:302021-03-24T04:34:03+5:30
धुळे शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी महत्वाच्या ठरणाऱ्या अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेत अक्कलपाडा धरणाजवळ जलशुध्दीकरण केंद्राचे बांधकाम सुरु आहे. या केंद्राची शुध्दीकरण ...

अक्कलपाडा पाणी योजनेच्या कामाला गती, वन विभागाचा अडसर दूर; जलवाहिनीच्या कामाला सुरुवात
धुळे शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी महत्वाच्या ठरणाऱ्या अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेत अक्कलपाडा धरणाजवळ जलशुध्दीकरण केंद्राचे बांधकाम सुरु आहे. या केंद्राची शुध्दीकरण क्षमता ६९ एमएलडी आहे. आतापर्यंत त्याचे २५ टक्केपेक्षा अधिक काम झाले आहे. या जलशुध्दीकरण केंद्रावरुन धुळे शहरातील जलकुंभांना थेट पाणीपुरवठा होणार आहे.
अक्कलपाडा प्रकल्पापासून शहरातील हनुमान टेकडी जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत ४० किलोमीटर जलवाहिनी टाकण्याचे काम ३० किलोमीटरपर्यंत पूर्ण झाले आहे. तसेच मोरोणे गावापासून नगाव बायपासने नगावबारी जलकुंभापर्यंत १३ किलोमीटर जलवाहिनी टाकली जाणार आहे. अक्कलपाडा धरणातील पाणी तेथील जलशुध्दीकरण केंद्रात शुध्द केले जाईल. पाणी उचलण्यासाठी धरणाच्या क्षेत्रात जॅकवेल आवश्यक आहे. परंतु धरणाची पाणी पातळी अधिक असल्याने विहिर खोदणे शक्य नाही. त्यामुळे काम थांबले आहे. धरणाची पाणी पातळी कमी झाल्यावर जॅकवेलचे काम सुरु होणार आहे.
विशेष म्हणजे या योजनेचे काम पूर्ण झाल्यावर शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे महानगरपालिकेचे नियोजन आहे. सध्या पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांची गैरसोय होते. पाच दिवस पुरेल इतके पाणी साठवणे सामान्यांना शक्य होत नाही. त्यामुळे शेवटच्या दिवशी पाण्यासाठी वणवण होते. उन्हाळ्यात अधिकच हाल होतात.