धुळे : शेतजमिनीवर रहिवासी परवानगी मिळालेला आदेश नोंदवून थाळनेरचे तलाठी यांच्याकडे पाठविण्यासाठी लाच स्विकारणारा शिरपूर येथील अव्वल कारकून आणि खासगी इसम यांना ८ हजाराची लाच स्विकारताला पकडण्यात आले़ यातील अव्वल कारकून संशयित कैलास कंखरे पळून जाण्यात यशस्वी ठरला़ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्याधुळे येथील पथकाने ही कारवाई बुधवारी दुपारी केली़ शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील तक्रारदार यांचा भाऊ महेंद्र शिरसाठ यांच्या नावे असलेली थाळनेर शिवारातील वडिलोपार्जित शेत जमिनीवर रहिवासी प्रयोजनार्थ बिनशेती (एनए) परवानगी मिळालेला आदेश नोंदवून तलाठी थाळनेर यांच्याकडे पाठविण्यासाठी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती़ यातील ८ हजार रुपये स्विकारण्यासाठी शिरपूर तहसील कार्यालयाचे अव्वल कारकून कैलास भिका कंखरे आणि खासगी इसम चंद्रसिंग भरतसिंग पवार (४५, रा़ बोराडी ता़ शिरपूर) हे दोघे गेले असता ८ हजार रुपयांची लाच स्विकारतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने छापा टाकला़ यावेळी पोलिसांच्या हाती चंद्रसिंग पवार सापडला़ मात्र, कैलास कंखरे पळून जाण्यात यशस्वी ठरला़ चंद्रसिंग पवार याला ताब्यात घेण्यात आले आहे़ ही कारवाई पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुनील कुराडे आणि त्यांच्या पथकाने केली आहे़
अव्वल कारकूनवर एसीबीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 19:30 IST