अंगणवाडीतील पोषण आहार वाटपात गैरव्यवहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:32 IST2021-07-26T04:32:49+5:302021-07-26T04:32:49+5:30
लॉकडाऊन काळात शासनाकडून एकात्मिक बालविकास विभागामार्फत अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार कडधान्य स्वरूपात वाटप करण्यात येत आहे. मात्र ...

अंगणवाडीतील पोषण आहार वाटपात गैरव्यवहार
लॉकडाऊन काळात शासनाकडून एकात्मिक बालविकास विभागामार्फत अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार कडधान्य स्वरूपात वाटप करण्यात येत आहे. मात्र येथील बालकांना पोषण आहार मिळाला नाही, अशी तक्रार ग्रामस्थ व पालकांनी ग्रामपंचायतीकडे केली होती. यापूर्वीही बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे बाभळे येथील अंगणवाडी सेविका पुरेशा पोषक आहार वाटप करीत नसल्याच्या तक्रारी आहेत. शनिवारी सरपंच, पोलीसपाटील, पालक व ग्रामस्थ यांनी अंगणवाडीला भेट दिली असता अंगणवाडीस्तरावरील टीएचआर नोंदवहीत नोंदविलेल्याप्रमाणे पोषण आहारातील पाकीट संख्येत तफावत आढळून आली. अंगणवाडीच्या पोषण आहारात अफरातफर करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सरपंच ज्ञानेश्वर पाटील, उपसरपंच भरत पाटील, पोलीसपाटील विलास साळुंखे, साहेबराव मोरे, महादू मालचे, रायबा ठाकरे, सतिलाल अहिरे, नंदलाल पाटील, राकेश पाटील, सागर पाटील, समाधान पाटील, सुनील कोळी, भुरा मालचे, अरुण मालचे, नाना मोरे, समाधान एच. पाटील, भाईदास सोनवणे, सुखदेव ठेलारी, गोविंदा ठेलारी आदी पालक व ग्रामस्थांनी केली आहे.
अंगणवाडी सेविका लाभार्थींना पोषण आहार वाटपात टाळाटाळ करीत आहे.अंगणवाडीत शालेय पोषण आहाराची पाकिटे आढळून आली. सेविकेकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यांना निलंबित करण्यात यावे.
- ज्ञानेश्वर पाटील,
सरपंच, वाघाडी-बाभळे ग्रुप ग्रामपंचायत
अंगणवाडी सेविकेबाबत तक्रार आल्यास चौकशी केली जाईल. प्रथम नोटीस बजावली जाईल. चौकशीत तथ्य आढळल्यास कारवाई करण्यात येईल.
- रवींद्र मराठे,
बालविकास प्रकल्प अधिकारी, शिंदखेडा