मित्राला कट मारण्याच्या कारणावरून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला
By देवेंद्र पाठक | Updated: July 16, 2023 17:33 IST2023-07-16T17:33:33+5:302023-07-16T17:33:49+5:30
शिरपूर तालुक्यातील बोराडी गावातील घटना, दोघांवर गुन्हा

मित्राला कट मारण्याच्या कारणावरून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला
धुळे : मित्राला कट मारण्याच्या कारणावरून मनात राग धरत दोघांनी मिळून परेश बडगुजर या तरुणावर कोयता आणि चाकूने सपासप वार करत गंभीर जखमी केले. ही घटना शिरपूर तालुक्यातील बोराडी गावात भरदुपारी घडली. मारेकरी फरार झाले असून त्यांच्या विरोधात रात्री उशिरा शिरपूर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
हल्ल्यात गंभीर जखमी झालेला परेश रवींद्र बडगुजर (वय २९, रा. बोराडी ता. शिरपूर) या तरुणाने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, मित्राला कट मारण्याच्या कारणावरून मनात दोघांनी राग धरला होता. त्याचा वचपा काढत दोघांनी नियोजन केले आणि परेश बडगुजर या तरुणाला बाेराडी गावातच गाठले. मारेकरी दोघे एका विना क्रमांकाच्या दुचाकीने आले. एकाच्या हातात कोयता आणि दुसऱ्याच्या हातात चाकू होता. उजव्या कानाच्या बाजूने डोक्यावर कोयत्याने हल्ला केला तर दुसऱ्याने डाव्या हाताच्या मनगटावर चाकूने वार करत गंभीर दुखापत केली. जखमी अवस्थेत त्याला तिथेच सोडून दोघांनी पळ काढला. ही घटना शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.
जखमी अवस्थेत परेश बडगुजर याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास परेश बडगुजर याने शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, कुणाल सुभाष नाईक (वय २०) आणि त्याचा साथीदार या दोघांवर भादंवि कलम ३०७, ५०४, ३४ सह महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१) (३) १३५ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक कृष्णा पाटील घटनेचा तपास करीत आहेत.