धुळे बसस्थानकात महिलेच्या पर्समधून ९४ हजारांचा ऐवज लांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2023 16:52 IST2023-04-06T16:52:01+5:302023-04-06T16:52:22+5:30
बसची वाट पाहत असतानाच चोरट्याने तिच्याजवळ येऊन तिच्या बॅगमधून पर्स लांबविली.

धुळे बसस्थानकात महिलेच्या पर्समधून ९४ हजारांचा ऐवज लांबविला
राजेंद्र शर्मा
धुळे - एका महिलेच्या बॅगमधील पर्समधून चोरट्याने शिताफीने हातसफाई करत रोख रकमेसह दागिने असा ९४ हजाराचा ऐवज चोरून नेल्याची घटना बुधवारी भरदुपारी धुळे बस स्थानकावर घडली. याप्रकरणी सायंकाळी शहर पोलिसात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील कजवाडी येथील भारती नीलेश शेवाळे (वय ३०) या महिलेने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, भारती शेवाळे ही महिला धुळे बसस्थानकाच्या आवारात असताना चोरट्याने तिला हेरले.
बसची वाट पाहत असतानाच चोरट्याने तिच्याजवळ येऊन तिच्या बॅगमधून पर्स लांबविली. ही घटना बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. काही वेळानंतर या महिलेला आपली बॅग उघडी असल्याचे दिसून आले. त्यात शोध घेतला असता त्याच्यात ठेवलेली पर्स तिला आढळून आली नाही. त्या पर्समध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ९४ हजाराचा ऐवज ठेवलेला हाेता. घाबरलेल्या या महिलेने बसस्थानकात शोध घेतला; पण चोरटा काही सापडला नाही. यानंतर त्या महिलेने शहर पोलिस ठाणे गाठत बुधवारी सायंकाळी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, शहर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस हेड कॉन्स्टेबल व्ही.एम. शिरसाठ घटनेचा तपास करीत आहेत.