अतिवृष्टी झाली, तर ९२ गावांना धोका ; पावसात फिरायला न गेलेलेच बरे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:37 IST2021-07-27T04:37:51+5:302021-07-27T04:37:51+5:30
सुनील बैसाणे धुळे : अतिवृष्टी किंवा धरणांमधून पाण्याचा विसर्ग केल्याने तापी आणि पांझरा नदीसह इतरही लहानमोठ्या नद्यांना पूर येतो. ...

अतिवृष्टी झाली, तर ९२ गावांना धोका ; पावसात फिरायला न गेलेलेच बरे !
सुनील बैसाणे
धुळे : अतिवृष्टी किंवा धरणांमधून पाण्याचा विसर्ग केल्याने तापी आणि पांझरा नदीसह इतरही लहानमोठ्या नद्यांना पूर येतो. त्यामुळे जिल्ह्यातील ९२ गावांना धोका असतो. ही गावे पूररेषेमध्ये येतात. पाऊस असल्यावर या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला जातो. तसेच धुळे शहरात जास्त पाऊस झाला तर रस्त्यांवर, वसाहतींमध्ये पाणी साचते. अशा वेळी बाहेर पडणे देखील शक्य होत नाही.
पाणी साचण्याची कारणे
शहराचा विस्तार वाढला तरी पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था अतिशय जुनी आहे.
पावसाळ्याच्या आधी होणारी नालेसफाई योग्य होत नसल्याने नाले तुंबतात.
शहरातील गटारींमधील घाण नियमित काढली जात नाही. त्यामुळे गटारी सुध्दा तुंबतात.
पाण्याचा निचरा होण्याची योग्य उपाययोजना नसल्याने शहरात पाणी साचते.
शहरातील पाणी साचणारी ठिकाणे
शहरात महानगरपालिकचा परिसर, साक्री रोडवरील गुरुनानाक सोसायटी, वलवाडी शिवारातील काॅलनी परिसर, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बाजारपेठेचा परिसर, नाल्यांच्या परिसरातील गल्ल्या आदी भागांमध्ये सर्वाधिक पाणी साचते.
पालिकेचे तेच ते रडगाणे
शहरातील विविध भागांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचते. नागरिकांकडून याबाबत ओरड देखील होते. मुरुम टाकून रस्त्यांची कामे करण्याची मागणी होते. नालेसफाई न केल्याने देखील पाणी साचते. परंतु अतिवृष्टी झाल्यावर पाणी साचणारच असे नेहमीचे रडगाणे पालिका गाते.
पाऊस नको नको सा !
नदीला पूर आल्यावर शिंदखेडा तालुक्यातील साहूर गावाला पाण्याचा वेढा पडतो. त्यामुळे गावाचा संपर्क तुटतो. पाण्याची पातळी इतकी असते की मदतकार्याला देखील अडथळे येतात. पुलाचे बांधकाम झाले असले तरी गावात पाणी शिरतेच. मागण्या प्रलंबित आहेत. - शानाभाऊ सोनवणे, सामा. कार्यकर्ते
वलवाडी शिवारातील आधारनगरसह नवीन वसाहतींमध्ये पाण्याचा निचरा होण्याची सोय नाही. गटारी नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात घरांना पाण्याचा वेढा असतो. रस्त्यांवरही पाणी साचते. घरातून बाहेर पडता येत नाही. अनेकवेळा तक्रारी करुनही पालिका लक्ष देत नाही. - दीपक लोंढे, नागरिक