धुळ्यात 92 टक्के करवसुलीवर प्रश्नचिन्ह!
By Admin | Updated: July 4, 2017 11:41 IST2017-07-04T11:41:50+5:302017-07-04T11:41:50+5:30
महापालिका : मागणीची रक्कम अंदाजे गृहीत धरल्याचे समोर, सहायक आयुक्तांकडून ‘ऑडिट’ची मागणी

धुळ्यात 92 टक्के करवसुलीवर प्रश्नचिन्ह!
>ऑनलाईन लोकमत
धुळे, दि.4 - महापालिकेने गेल्या वर्षी 92 टक्के करवसुलीचा डंका पिटला होता़ मात्र कराच्या एकूण मागणीचा आकडाच निश्चित नसताना 92 टक्के वसुली कोणत्या आधारावर गृहीत धरण्यात आली, हे स्पष्ट होत नसल्याने करवसुलीच्या आकडेवारीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आह़े नुकत्याच झालेल्या महासभेत विरोधी पक्षनेते गंगाधर माळी यांनी हा विषय उपस्थित केला होता़ दरम्यान, करवसुली विभागाच्या सहायक आयुक्तांनीच करवसुली विभागाच्या लेखापरीक्षणाची मागणी केली आह़े
करवसुलीवर यापूर्वीही आक्षेप
धुळे महापालिकेने गेल्या वर्षी नोटाबंदी, शास्ती माफी सवलत व विशेष मोहिमेच्या माध्यमातून 92 टक्के करवसुली केल्याचा दावा केला होता़ त्यामुळे धुळे मनपाची राज्यभरात वाहवा झाली, शिवाय तत्कालीन आयुक्त संगीता धायगुडे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कारदेखील झाला़ मात्र 92 टक्के करवसुलीच्या आकडेवारीवर त्याचवेळी भाजप नगरसेविका प्रतिभा चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन करवसुलीवर आक्षेप घेतला होता़ त्यामुळे आता करवसुलीची स्पष्टता करण्याची मागणी जोर धरू लागली आह़े
लेखापरीक्षणाची मागणी
करवसुली विभागाचे सहायक आयुक्त अभिजित कदम यांनी स्वत: पत्र देऊन करवसुली विभागाच्या विशेष लेखापरीक्षणाची मागणी पत्राद्वारे केली आह़े मात्र त्याबाबत आयुक्त सुधाकर देशमुख काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आह़े