९० टक्के पोलिसांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:37 IST2021-03-17T04:37:02+5:302021-03-17T04:37:02+5:30
धुळे : जिल्हा पोलीस दलातील ९० टक्के अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पहिला डोस घेतला आहे तर दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण ...

९० टक्के पोलिसांनी घेतली लस
धुळे : जिल्हा पोलीस दलातील ९० टक्के अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पहिला डोस घेतला आहे तर दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण २० टक्के आहे.
पोलिस दलात १०४ अधिकारी आणि १७३९ अंमलदार असे एकूण १८४३ अधिकारी, कर्मचारी आहेत. त्यापैकी ८५ अधिकाऱ्यांनी आणि १ हजार ८१ अंमलदारांनी कोरोनाचा पहिला डोस घेतला आहे. ३० अधिकारी आणि २६४ अंमलदारांनी दुसरा डोस घेतला आहे. ही आकडेवारी १५ मार्चपर्यंतची आहे. दोन दिवसात हा आकडा आणखी वाढणार आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग सुरु झाला आणि लाॅकडाऊन करण्यात आले. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक नियमांच्या अंमलबजावणीची महत्वाची जबाबदारी पोलिसांवर आली आणि ती त्यांनी प्रामाणिकपणे पार देखील पाडली. सुरुवातील समजूत काढून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. परंतु काही टवाळखोरांना आणि रिकामटेकड्यांना लाठीचा प्रसादही खावा लागला. कोरोनाच्या काळात पोलिसांनी गरजूंना मदत करुन सामाजिक बांधिलकी देखील जोपासली. इतरांच्या संरक्षणासाठी जीवाची पर्वा न करणाऱ्या पोलिसांना आता लसीकरण सुरु आहे.
२० टक्के पोलिसांनी घेतला दुसरा डोस
धुळे जिल्हा पोलीस दलातील ९० टक्के पाेलिसांनी कोरोनाचा पहिला डोस घेतला आहे तर २० टक्के पोलिसांनी दुसरा डोस देखील घेतला आहे. दररोज लसीकरणासाठी अधिकारी कर्मचारी जात असल्याने दोन दिवसात ही टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.
धुळे जिल्हा पोलिस दलातील ७० टक्के महिला कर्मचाऱ्यांनी कोरोनाचा पहिला डोस घेतला आहे. दुसरा डोस घेण्याचे प्रमाण अजून कमी आहे. काही महिला कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या कारणामुळे लस घेता आलेली नाही. महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर देखील कोरोनाच्या काळात फ्रंटलाईनवर काम करण्याची महत्वाची जबाबदारी असते. त्यामुळे त्यांना लस दिली जात आहे. महिला कर्मचारी आपली सेवा बजावून लस घेत आहेत.
शहरी भागासह ग्रामीण भागात सेवा बजावणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. महिला पोलिसांना कुटुंबाची जबाबदारी सांभाळून ड्युटी करावी लागते. कोरोना काळात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी महिला कर्मचाऱ्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली आहे. विशेष म्हणजे या काळात त्यांनी नियम न पाळणाऱ्यांवर केवळ कारवाईच केली नाही तर त्यांना नियमांची जाणिव करुन देत जनजागृती देखील केली. दुहेरी काम केले.