कोरोना काळातही लहान बालकांचे ९० टक्के लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:36 IST2021-02-16T04:36:41+5:302021-02-16T04:36:41+5:30
धुळे - कोरोना काळातही जिल्ह्यातील ९० टक्के बालकांना यशस्वीपणे लस देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे. एप्रिल ...

कोरोना काळातही लहान बालकांचे ९० टक्के लसीकरण
धुळे - कोरोना काळातही जिल्ह्यातील ९० टक्के बालकांना यशस्वीपणे लस देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे. एप्रिल ते जानेवारीपर्यंतची ही माहिती आहे. मार्चअखेरपर्यंत लसीकरणाचे उद्दिष्ट प्राप्त करायचे असते. आत्ताच ९० टक्के लसीकरण पूर्ण झाले असून अजून अडीच महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे मार्चअखेरपर्यंत प्राप्त उद्दिष्टापेक्षा अधिक लसीकरण करण्यात यशस्वी होऊ, अशी माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. शिवचंद्र सांगळे यांनी दिली.
बीसीजी, पेंटा, पेंटा २, पेंटा ३, ओरल पोलिओ ०, ओरल पोलिओ १, हिपेटायटीस बी आदी महत्त्वाच्या लसी बालकांना देण्यात आल्या आहेत.
कोरोना काळातही सुरू होते लसीकरण -
जिल्ह्यात कोरोना काळातही लसीकरण सुरू होते. ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र, उपकेंद्र व आशा स्वयंसेविका यांच्या माध्यमातून लहान बालकांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरण करण्यात ग्रामीण आरोग्य यंत्रणेची चांगलीच कसोटी लागली होती. कारण यावेळी बाहेर गावाहून परतणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी होती. त्यांचे सर्वेक्षण करणे व बालकांचे लसीकरण अशी दुहेरी जबाबदारी ग्रामीण आरोग्य यंत्रणेने पार पडली.
म्हणून गरजेचे असते लसीकरण -
बालकांना जन्मापासून एक वर्षापर्यंत प्राथमिक लसीकरण करणे गरजेचे असते. त्यामुळे लहान मुलांना होऊ शकणाऱ्या घटसर्प, गोवर, डांग्या खोकला, धनुर्वात, क्षयरोग, पोलिओ या आजारांपासून संरक्षण मिळते. बी.सी.जी. ही लस क्षयरोग होऊ नये म्हणून वापरली जाते. जन्माताच किंवा एक - दोन दिवसात ही लस बाळाला दिली जाते. तसेच बालकाच्या जन्मानंतर तीन महिन्यांपर्यंत त्रिगुणी लस दिली जाते. खोकला, घटसर्प, धनुर्वात या तीन लसीचा समावेश यात होतो.
महानगरातून आलेल्या बालकांचे लसीकरण -
कोरोनामुळे पुणे, मुंबई व परराज्यात वास्तव्याला असलेले जिल्ह्यातील अनेक कुटुंबे परत गावाकडे आले होते. त्या कुटुंबातील लहान बालकांचेही लसीकरण करण्यात आले. त्यामुळे लसीकरणाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. या बालकांची नोंदणी आरोग्य विभागाकडे नव्हती मात्र लसीकरण सुरु झाल्यानंतर आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या माध्यमातून त्यांना लस देण्यात आली.
आता पुढे काय -
मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत उद्दिष्ट प्राप्त करणे गरजेचे आहे. आतापर्यंत ९० टक्के बालकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे मार्च महिन्यापर्यंत १०० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण होऊ शकते.
प्रतिक्रिया -
लसीकरणामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. जिवाणू व विषाणूजन्य आजारांविरुद्ध लढण्यासाठी लसीकरण महत्वाचे असते. नियमानुसार वेळोवेळी लसीकरण करावे.
- डॉ. तुषार कानडे, बालरोग तज्ज्ञ
लसीकरणाला बालकांचे कवच कुंडल म्हटले आहे. शासकीय अथवा खाजगी रुग्णालयातून लस घ्या. मात्र लस टाळू नका. काही शंका असल्यास बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. महेश अहिरराव, बालरोग तज्ज्ञ