जिल्हा रुग्णालयात ८५ बेड धूळखात ; बेड अभावी रुग्णांची वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:36 IST2021-04-01T04:36:22+5:302021-04-01T04:36:22+5:30

धुळे - जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एकीकडे रुग्णालयात बेड मिळण्यासाठी रुग्ण व नातेवाईकांची भटकंती ...

85 beds dusted in district hospital; Patients without beds | जिल्हा रुग्णालयात ८५ बेड धूळखात ; बेड अभावी रुग्णांची वणवण

जिल्हा रुग्णालयात ८५ बेड धूळखात ; बेड अभावी रुग्णांची वणवण

धुळे - जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एकीकडे रुग्णालयात बेड मिळण्यासाठी रुग्ण व नातेवाईकांची भटकंती सुरु आहे. मात्र दुसरीकडे जिल्हा रुग्णालयात ८५ बेड धूळखात पडले असल्याचे धक्कादायक चित्र आहे. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माणिक सांगळे यांच्याशी संपर्क साधला असता जिल्हा रुग्णालयातील ८५ बेड महानगर पालिकेच्या कोविड केअर केंद्राला देणार असल्याचे यांनी सांगितले. मात्र मनपाचे नवीन कोविड केंद्र अद्याप सुरु झालेले नाही. त्यामुळे अजून किती दिवस बेड धूळखात पडतील असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

जिल्ह्यातील बाधित रुग्णांच्या संख्येने २५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तसेच अक्टिव्ह रुग्णांची संख्या ४ हजार १६२ वर पोहोचली आहे. अनेक कोरोना बाधित रुग्णांना रुग्णालयात बेड मिळत नसल्याने जोखीम पत्करून घरी राहावे लागत आहे. अशी विदारक परिस्थिती असताना मात्र जिल्हा रुग्णालयात ८५ बेड धूळखात पडले आहेत. आता जिल्हा रुग्णालयातील हे बेड महानगरपालिकेला देण्यात येणार आहेत. मात्र त्यासाठी अजून वाट पाहावी लागणार आहे. जर ते बेड दुसऱ्या रुग्णालयाला किंवा कोविड केअर केंद्राला दिले तर त्याचा लाभ कोरोना बाधित रुग्णांना होऊ शकतो. रुग्णांची बेड अभावी होणारी फरपट थांबू शकते तसेच यंत्रणेवरील ताणही कमी होऊ शकतो. जिल्हा रुग्णालयातील धूळखात पडलेल्या बेडपैकी केवळ ५० बेड मनपा कोविड केंद्राला देणार असल्याची चर्चा सुरुवातीला होती. मात्र सर्वच बेड मनपा कोविड केंद्राला देणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सांगळे यांनी स्पष्ट केले आहे.

महिला रुग्णालयासाठी ८५ बेड जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाले होते. मात्र महिला रुग्णालयाच्या इमारत दुरुस्तीचे काम सध्या सुरु असल्याने बेड पडून आहेत. रुग्णांची संख्या वाढल्याने मनपाचे अजून एक कोविड केअर केंद्र जिल्हा रुग्णालयातील एका इमारतीत सुरु होणार असल्याची माहिती आहे. तात्काळ कोविड केअर केंद्र सुरु करून रुग्णांचे हाल थांबणे गरजेचे आहे.

मनपा कोविड केंद्रासाठी जिल्हा रुग्णालयाकडून बेड मिळणार आहेत. ऑक्सिजन पाईप लाईनचे काम केल्यानंतर कोविड केंद्र सुरु होईल. लवकरच ऑक्सिजन पाईप लाईनच्या कामाला सुरुवात होईल.

- डॉ.महेश मोरे, आरोग्य अधिकारी मनपा

जिल्हा रुग्णालयातील ८५ बेड महानगर पालिकेच्या कोविड केंद्राला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयात आयसीयूची सुविधा व पुरेसे बेड नसल्याने प्राप्त झालेले व्हेंटिलेटर हिरे वैद्यकीय महाविद्यालय व सांगली येथे पाठवण्यात आले आहेत.

- डॉ.माणिक सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक

Web Title: 85 beds dusted in district hospital; Patients without beds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.