८ बेरोजगार युवक-युवती प्रशिक्षणासाठी रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 22:28 IST2019-07-28T22:27:50+5:302019-07-28T22:28:23+5:30
म्हसदी : ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान

ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत चिंचखेडे येथून बेरोजगार युवक-युवती प्रशिक्षणासाठी रवाना झाले. यावेळी सरपंच अभिमन सोनवणे, उपसरपंच प्रमोद बेडसे, ग्रामसेवक भारत पाटील, नंदू जाधव आदी.
म्हसदी : ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत साक्री तालुक्यातील चिंचखेडे येथील ८ बेरोजगार युवक-युवतींची प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. या बेरोजगारांना नाशिक येथे प्रशिक्षणासाठी रवाना करण्यात आले.
चिंचखेडे या गावाची ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात निवड झाली असून गावासाठी मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक नेमला आहे. गावाचा ग्रामविकास आराखडा तयार झाला आहे. यात कृषी, आरोग्य, शेती, उपजीविका, शिक्षण, रोजगार इत्यादी बाबींवर कामे घेतली आहेत.
याचाच एक भाग म्हणून गावातील अनुसूचित जाती, जमातीच्या मुला-मुलींना पंडित दीनदयाळ उपाध्याय कौशल्य विकास योजनेतंर्गत प्रशिक्षण देऊन खाजगी क्षेत्रात नोकरी मिळवून देण्यासाठी गावातील ८ मुलांची तुकडी नाशिक येथील निसा सिक्युरिटी या नामांकित प्रशिक्षण केंद्रात ३ महिन्याच्या निवासी प्रशिक्षणास पाठविण्यात आली. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यावर नोकरी देखील मिळणार असल्याने ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानामुळे आदिवासी कुटुंबांना आर्थिक हातभार लागणार आहे.
या प्रशिक्षणास पंडित वाघ, आनंदा वाघ, आकाश मोरे, सुनील सोनवणे, नितीन वेंदे, जागृती मोरे, राधा वाघ, पूजा माळीच यांना प्रशिक्षणास पाठविण्यात आले. यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे शाखा अभियंता राजेंद्र कुकावलकर यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी चिंचखेडे गावाचे सरपंच अभिमन सोनवणे, उपसरपंच प्रमोद बेडसे, ग्रामसेवक भारत पाटील, मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक नंदू जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.