अक्कलपाड्यात ७० टक्के जलसाठा अडविण्यात यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:38 IST2021-08-26T04:38:56+5:302021-08-26T04:38:56+5:30
माजी आमदार प्रा. शरद पाटील यांची मागणी धुळे : निम्नपांझरा अक्कलपाडा धरणात यंदाही ७० टक्के जलसाठा निर्माण करण्याचे उद्दिष्ट ...

अक्कलपाड्यात ७० टक्के जलसाठा अडविण्यात यावा
माजी आमदार प्रा. शरद पाटील यांची मागणी
धुळे : निम्नपांझरा अक्कलपाडा धरणात यंदाही ७० टक्के जलसाठा निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून ५० टक्के जलसाठा निर्माण झाल्यानंतर उजव्या व डाव्या कालव्याद्वारे नकाणे, हरण्यामाळ, कोठरे, निमडाळे, गोंदूर तलाव तसेच या बंधाऱ्यांवर अवलंबून असणारे साठवण तलाव भरून घेण्याचे नियोजन करण्यात यावे अशी मागणी माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी जिल्हा प्रशासन व धुळे पाटबंधारे विभाग व मनपाकडे केली आहे.
अक्कलपाडा धरण हे धुळे जिल्ह्याच्या दुष्काळी परिस्थितीवर अत्यंत उपयुक्त ठरत असून धरणातील पाण्याचा धुळे शहरासह ग्रामीण भागातील सुमारे १०० खेड्यांना उपयोग होत आहे. साक्री, धुळे, शिंदखेडा व अमळनेर तालुक्यातील पांझरा काठावरील गावांना या धरण्याच्या पाण्याचा लाभ मिळत असल्याने लोकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अक्कलपाडा धरणावर दुष्काळी परिस्थितीची पूर्ण भिस्त अवलंबून आहे. अक्कलपाडा धरणांत अपेक्षित जलसाठा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून व अक्कलपाडा धरणाशी संबंधित अपूर्ण कामांची आणि वाढीव भूसंपादन विषयांबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
या आहेत मागण्या
अक्कलपाडा धरणातील वाढीव बुडित क्षेत्रात भूसंपादन करून शेतकऱ्यांना नवीन प्रचलित दराप्रमाणे पूर्ण मोबदला देण्यात यावा. जोपर्यंत पूर्ण मोबदला मिळत नाही तोवर ७० टक्केच जलसाठा निर्माण करणे शक्य होणार आहे. अक्कलपाडा धरणात ५० टक्के जलसाठा निर्माण झाल्यानंतर उजव्या व डाव्या कालव्याद्वारे नकाणे तलाव, हरण्यामाळ साठवण तलाव तसेच डाव्या कालव्याद्वारे खाऱ्या लघुप्रकल्प, निमडाळे, कोठारे लघुप्रकल्प, गोंदूर तलाव भरून घेण्याचे व डावा कालवा वहन क्षमतेसाठी पूर्ण प्रवाही करण्याचे निश्चित करावे. धरणाच्या उगम क्षेत्रावर चांगला पाऊस झाल्यास अक्कलपाडा धरणातील पाण्याद्वारे उजव्या-डाव्या कालव्यालगत येणारे लहान मोठे बंधारे पावसाळा संपण्यापूर्वी भरून घेण्याचे नियोजन करावे. अक्कलपाडा धरणातील डाव्या कालव्यालगत अपूर्ण पोटचाऱ्यांचे काम पूर्ण करून त्यासाठी लागणारा वाढीव निधी उपलब्ध करून द्यावा. जीपीएस सॅटेलाईट पद्धतीने केलेल्या वाढीव बुडित क्षेत्राचे सर्वेक्षण ग्राह्य धरून नवीन जमिनी संपादन करण्यासाठी पक्क्या खुणा निश्चित करून कार्यकारी संचालक, तापी पाटबंधारे मंडळ जळगांव यांच्याकडे सुधारित वाढीव भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या संमतीने सादर करण्यात यावा. त्यासाठी नियामक मंडळाची मान्यता घ्यावी. अक्कलपाडा धरणाखालील संभाव्य १३०० हेक्टर शेती क्षेत्र जुन्या ब्रिटिशकालीन पांझरा फडपद्धतीवर अवलंबून आहे. यासाठी टप्प्या-टप्प्याने बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी व फडपद्धत पुनर्जीवित करण्यासाठी कार्यकारी संचालक, तापी पाटबंधारे विभाग जळगांव यांच्या माध्यमातून कार्यकारी अभियंता धुळे पाटबंधारे विभाग यांनी फडपद्धत जिवंत करण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी मूळ प्रकल्पाव्यतिरिक्त अतिरिक्त निधीची तरतूद करावी. अक्कलपाडा धरणाखालील उजव्या व डाव्या कालव्याअंतर्गत येणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या स्वतंत्र पाणी वाटप संस्था स्थापन करून त्यांना पाण्याची बचत व वितरणाचे प्रशिक्षण द्यावे. शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकांसाठी नाशिक जिल्ह्यातील कार्यरत असणाऱ्या पाणी वाटप संस्थांच्या कामाची माहिती करून घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या सहली आयोजित करण्यासाठी पाटबंधारे विभागास निर्देश द्यावेत. पांझरा नदीतील पावसाळ्याच्या पाण्यातून सोनवद मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने प्रकल्पीय अहवालाप्रमाणे भरणे क्रमप्राप्त आहे. परंतु चालू वर्षी पांझरा नदी प्रवाहीपणे वाहत नसल्याने अक्कलपाडा धरणातून पाण्याचे वितरण करून सोनवद प्रकल्प भरून घेण्यासाठी यंत्रणेला आदेश द्यावे अशी मागणी शरद पाटील यांनी केली आहे.