लाटीपाडा धरणात ५० टक्के पाणी साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 11:59 IST2019-08-01T11:58:46+5:302019-08-01T11:59:08+5:30
साक्री तालुका : संततधार पावसामुळे बहुतांश धरणात १०० टक्के साठा, पिकांना मिळाले जीवदान

लाटीपाडा धरणात ५० टक्के पाणी साठा
लोकमत न्यूज नेटवर्क
साक्री/पिंपळनेर : गेल्या आठ दिवसांपासून संततधार पावसामुळे साक्री तालुक्यातील बहुतांश धरण १०० टक्के भरले असून लाटीपाडा धरणात ५० टक्के पाणी साठा झाला आहे. तसेच पावसामुळे दुबार पेरणीचे संकट टळले असून पिकांना जीवदान मिळाले आहे.
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी लाटीपाडा धरणाचा जलसाठा हा फक्त अर्धा ते एक टक्का एवढा होता. तसेच खरीप हंगामात पिकांची पेरणी झालेली असतांना पाऊस लांबल्याने शेतकºयांच्या चिंता वाढल्या होत्या. परंतू गेल्या आठ दिवसांपासून संततधार पाऊस सुरु झाल्याने पिकांना मोठा आधार मिळाला आहे. तसेच लाटीपाडा धरण ५० टक्के भरले आहे.
यंदा तीव्र उन्हाळा असल्याने पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली होती. तसेच नदीतही जेमतेमच पाणी होते. परंतू गेल्या आठ दिवसांपासून पावसाने आपला जोर कायम ठेवल्याने पश्चिम पट्ट्यातील नदी-नाले पाण्याने भरुन ओसंडून वाहून निघाल्याने हे सर्व पाणी लाटीपाडा धरणात येत आहे. यामुळे धरणाची पाण्याची पातळी वाढली आहे. येणाºया काही दिवसांमध्ये याच प्रमाणात पाऊस आल्यास लवकरच लाटीपाडा धरण ओसंडून वाहून निघेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पावसाचे योग्यवेळी आगमन झाल्याने खरीप हंगामातील शेतकºयांची पिकेही शेतांमध्ये हिरवीगार झाल्याचे पाहण्यास मिळत आहे तर दुबार पेरणीचे मोठे संकट दूर झाले आहे. पिंपळनेरच्या पश्चिम पट्टयात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने जोर कायम ठेवल्याने पांझरा नदी वाहून निघाली आहे.
भात शेतीची रोपणी सुरु
तसेच भात शेतीची रोपणी मोठया प्रमाणात सुरू आहे. यामुळे शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे, तर शेतकरी बांधवांना लाटीपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहण्यासाठी तरी काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे.
जलयुक्त बंधारे तुडूंब
जलयुक्त शिवारअंतर्गत झालेले लहान-लहान बंधारे, तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. मालपुर- कासारे दरम्यान असलेला बंधारा यावर्षी पूर्ण करण्यात आला आहे.
या बंधाºयामुळे मोठया प्रमाणात पाणी अडविण्याची क्षमता निर्माण झाल्याने पाण्याचा फ्लो मोठया अंतरापर्यंत मागे गेला आहे. यामुळे मालपुर आणि कासारे ही दोन्ही गावे एखाद्या धरणाच्या काठावर वसलेली आहेत, असे नयनरम्य चित्र निर्माण झाले आहे. लघु सिंचन विभागाने बांधलेल्या या बंधाºयामुळे दोन्ही गावांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर पावसाने मोठी दडी मारली होती. यामुळे दुबार पेरणीचे संकट उभे राहते कि काय, अशी भीती व्यक्त होत होती. परंतू वरुणराजाने कृपा केल्याने तालुक्यातील धरणे भरली असून दुबार पेरणीचे संकट टळले आहे.