५ हजार ९९० मजुरांना मिळाला रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:09 IST2020-02-12T23:09:28+5:302020-02-12T23:09:48+5:30
रोजगार हमी योजना : धुळे जिल्ह्यात १ हजार १०७ कामे सुरू

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत विविध विभागांमार्फत साक्री, शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यात १ हजार १०७ कामे सुरू असून त्यात ५ हजार ९९० मजुरांना रोजगार मिळाला आहे़ विशेष म्हणजे धुळे तालुक्यात सध्या एकही काम सुरू नाही़
साक्री तालुका
तालुक्यात रस्त्याचे एक काम सुरू असून ११ मजुरांची उपस्थिती आहे़ जलसंधारणाची ९३ कामे सुरू असून १ हजार १०७ मजुरांना काम मिळाले आहे़ कृषी विभागामार्फत ३६ कामे सुरू असून २२८ मजुरांची उपस्थिती आहे़ इतर ४१६ कामांवर १८४८ मजुर काम करीत आहेत़ वनीकरणाची ६ कामे सुरू असून १०१ मजुरांची उपस्थिती आहे़ ग्रामपंचायत स्तरावर साक्री तालुक्यात एकूण ५५२ कामे सुरू असून ३ हजार २९५ मजुरांना रोजगार मिळाला आहे़
शिंदखेडा तालुका
तालुक्यात एकूण १५१ कामे सुरू असून ५९८ मजुरांना रोजगार मिळाला आहे़ त्यात जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत रस्त्यांची पाच कामे सुरू असून त्यावर ६१ मजुरांना काम मिळाले आहे़ कृषी विभागाचे एक काम सुरू पाच मजुरांची उपस्थिती आहे़ इतर १४५ कामे सुरू असून ५३२ मजुरांना रोजगार मिळाला आहे़
शिरपूर तालुका
शिरपूर तालुक्यात जलसंधारणाची २२ कामे सुरू असून १८७ मजुरांची उपस्थिती आहे़ इतर ३८२ कामे सुरू असून १९१० मजुरांची उपस्थिती आहे़ एकूण ४०४ कामांवर २ हजार ९७ मजुरांना रोजगार मिळाला आहे़
जिल्ह्यात सध्या जलसंधारणाची सर्वाधिक ११५ कामे सुरू आहेत़ त्यात १२९४ मजुरांना रोजगार मिळाला आहे़ कृषी विभागामार्फत केवळ साक्री तालुक्यात आहेत़ इतर तालुक्यांमध्ये कामे सुरू नाहीत़ इतर कामांची संख्या जास्त असली तरी त्यात सर्वाधिक सिंचन विहिरींच्या कामांचा समावेश आहे़ असे असले तरी जमिनीची पाण्याची पातळी वाढल्यामुळे विहिरींची कामे खोळंबली आहेत़ विहिरींची कामे मुदतीत न झाल्यास निधी परत जाण्याची शक्यता आहे़