शिरपुरात ९० कोटी रुपयांची ५५० घरकुले मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:43 IST2021-09-08T04:43:20+5:302021-09-08T04:43:20+5:30
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घटक क्रमांक ३ ए.एच.पी. प्रकल्प केंद्रीय मान्यता व सनियंत्रण समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. या ...

शिरपुरात ९० कोटी रुपयांची ५५० घरकुले मंजूर
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घटक क्रमांक ३ ए.एच.पी. प्रकल्प केंद्रीय मान्यता व सनियंत्रण समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत लाभार्थींचे सर्वेक्षण करून अर्ज प्राप्त करणे, पात्र लाभार्थींची यादी प्रसिद्ध करणे आदी कामे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. या कामी माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या प्रयत्नातून योजनेच्या कामांना त्वरित मंजुरी प्राप्त झाली आहे.
हा प्रकल्प शिरपूर-वरवाडे नगरपरिषदेच्या मालकीच्या मुकेशभाई रिक्रिएशन गार्डनच्या मागे, भूखंड स.नं.६० या जागेवर प्रस्तावित आहे. प्रकल्पांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी ४०० घरकुले व मध्यम उत्पन्न गट घटकासाठी १५० घरे असा एकूण ५५० घरकुलांचा यात समावेश आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत (रस्ते, गटार, पाणीपुरवठा आदींसह) ९०.०२ कोटी रुपये एवढी आहे. प्रधानमंत्री आवस योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व मध्यम उत्पन्न गट घटकसाठी पात्र लाभार्थींना प्रत्येकी २.५० लाख रुपये अनुदान मिळणार आहे. या प्रकल्पाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक व प्रशासकीय मान्यता म्हाडा कार्यालयाकडून नुकतीच प्राप्त झालेली असून, लवकरच प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात होणार आहे.
माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, नगरसेवक-नगरसेविका, मुख्याधिकारी आबा महाजन, नगर अभियंता माधवराव पाटील, प्रशासकीय अधिकारी संजय हसवाणी, अमरावती येथील आर्किटेक्ट अमित अग्रवाल, अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रयत्नातून शहरातील पात्र लाभार्थींना स्वत:चे घरकूल मिळण्याचे स्वप्न साकार होणार आहे.