८ लाख बालकांना मिळणार गोळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 14:25 IST2019-08-02T14:25:06+5:302019-08-02T14:25:22+5:30
राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे औचित्य : दोन टप्प्यात असणार नियोजन

८ लाख बालकांना मिळणार गोळ्या
आॅनलाइन लोकमत
धुळे : राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त ८ आॅगस्ट २०१९ रोजी धुळे जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील ८ लाख १९ हजार ३७६ बालकांना जंत नाशकाची गोळी देण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी दिली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार देशात ६८ टक्के बालकांमध्ये आढळून येणारा आतड्यांचा कृमी दोष हा मातीतून प्रसारीत होणाऱ्या जंतूमुळे होतो. २८ टक्के बालकांना कृमी दोष होण्याची शक्यता असते. त्याचे प्रमुख कारण म्हणजे वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचा अभाव होय. या कृमी दोषांचा संसर्ग दूषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे सहज होतो. बालकांमध्ये होणारा दीर्घकालिन कृमी दोष हा व्यापक स्वरुपाचा असून मुलांना कमकुवत करतो. कृमी दोषामुळे रक्ताक्षय व कुपोषणाबरोबरच मुलांची बौध्दिक व शारीरिक वाढ खुंटण्याचे एक कारण आहे. देशात ६ ते ५९ महिन्यांच्या वयोगटात प्रत्येकी १० बालकांमागे ७ बालकांमध्ये रक्ताक्षय आढळतो. ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक असू शकते. तसेच १५ ते १९ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये व ३० टक्के किशोरवयीन मुलांमध्ये रक्ताक्षय आढळतो.
देशात ५ वषार्खालील सुमारे ५० टक्के बालकांची वाढ खुंटलेली आहे आणि साधारणत: ४३ टक्के बालके कमी वजनाची आहेत. राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा उद्देश १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व पूर्व शालेय वयोगटातील बालके व शालेय वयोगटातील विद्यार्थी यांना शाळा व अंगणवाडी केंद्रस्तरावर जंतनाशक गोळी देवून त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषणस्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा आहे. तालुकास्तरावर मोहिमेंतर्गत शाळेतील नोडल शिक्षकांना गटशिक्षणाधिकारी व तालुका आरोग्याधिकारी यांच्यामार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, पर्यवेक्षक व इतर आरोग्य कर्मचाºयांना प्रशिक्षण दिले आहे. ८ आॅगस्ट रोजी जेवणानंतर शाळा, अंगणवाडी केंद्रांत जंतनाशक गोळी देण्यात येईल. ज्यांना पहिल्या टप्प्यात गोळी दिली जाणार नाही, त्यांना १६ आॅगस्ट रोजी मॉप- अप दिनी गोळी देण्यात येईल. बालकांना या गोळीचा लाभ द्यावा, असे आवाहन जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी गंगाथरण डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी., जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी केले आहे.