सोनगीरच्या दंगलप्रकरणी ३२ जणांविरुध्द गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 13:28 IST2018-02-18T13:27:59+5:302018-02-18T13:28:32+5:30
७ जणांना अटक : पहाटेची कारवाई, इतरांची धरपकड सुरु

सोनगीरच्या दंगलप्रकरणी ३२ जणांविरुध्द गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : तालुक्यातील सोनगीर गावात भाजी विक्रेत्यांमध्ये गाडी लावण्याच्या वादातून शनिवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दोन गट समोरा-समोर आले़ किरकोळ दगडफेक झाल्याने तणाव निर्माण झाला होता़ याप्रकरणी रविवारी पहाटे पावणे चार वाजता ३२ संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला़ पहाटेचा धरपकड करत ७ जणांना अटक करण्यात आली आहे़
घटनेची माहिती मिळताच सोनगीर पोलीस दाखल झाले होते़ धुळ्यातूनही पोलीस अधिकारी, कर्मचारी सोनगीरला रवाना झाले होते़ दोन जणांमधील वाद विकोपाला गेल्याने भांडणाचे पर्यवसान हाणामारीत झाले़ दोन गट समोरा-समोर भिडल्याने आणि दगडफेकीमुळे सोनगीर गावात तणाव निर्माण झाला होता़ परिणामी भितीचे वातावरण तयार झाल्याने उलट-सुलट अफवा पसरल्या़ घटनेचे गांभिर्य पहाता धुळ्यातूनही पोलिसांचा मोठा फौजफाटा सोनगीरला रवाना झाला होता़ सोनगिरात तणावपुर्ण शांतता आहे़
रविवारी पहाटे पावणे चार वाजता संशयित ३२ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला़ पैकी ७ जणांना अटक करण्यात आली़ त्यात दीपक अशोक माळी (२४), संतोष भगवान अहिरे (२८), बुधा भगवान माळी (३४), प्रशांत प्रभाकर चव्हाण (३१), हर्षदखान फरीदखान कुरेशी (२७), वसीम खान मोसीन खान (२२), शेरु खान अब्बास खान (४६) या संशयितांना रविवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली़ घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे करीत आहेत़