ग्रामपंचायत निवडणुकीत ३ हजार १९ जणांचे नोटाला मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:32 IST2021-01-21T04:32:38+5:302021-01-21T04:32:38+5:30
जिल्हयातील २१८ ग्रामपंचायतींची मुदत संपली होती. मात्र माघारीपर्यंत ३६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. त्यामुळे गेल्या शुक्रवारी १८२ ग्रामपंचायतींसाठीच मतदान झाले. ...

ग्रामपंचायत निवडणुकीत ३ हजार १९ जणांचे नोटाला मतदान
जिल्हयातील २१८ ग्रामपंचायतींची मुदत संपली होती. मात्र माघारीपर्यंत ३६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. त्यामुळे गेल्या शुक्रवारी १८२ ग्रामपंचायतींसाठीच मतदान झाले. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ३ लाख ७९ हजार ८१३ पैकी २ लाख ९२ हजार १४८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ७७ टक्के एवढी होती.
१८ वर्षावरील व्यक्तीला शासनाने मतदानाचा अधिकार बहाल केलेला आहे. अनेकजण आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करतात. मात्र काहींना उमेदवार पसंत नसतात, मात्र मतदानाचा अधिकार बजावता यावा म्हणून ते ‘नोटा’चा पर्याय निवडतात. आता शहरी भागातच नव्हे, तर ग्रामीण भाागतील मतदारही ‘नोटा’चा वापर करू लागल्याचे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या मतदानावरून दिसून आले. ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यातील ३ हजार १९ मतदारांनी नोटाचा वापर केला. नोटाला एकूण ९ हजार ३१३ मते मिळाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
सोनगीर, कापडणे ग्रामपंचायतीत नोटाला सर्वाधिक मतदान
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत धुळे तालुक्यातील सोनगीर ग्रामपंचायतीमध्ये ६७१, तर कापडणे ग्रामपंचायतीत २८६ जणांनी नोटाचा पर्याय वापरलेला हाेता. त्याखालोखाल बोरीस ग्रामपंचायतीत २२४ जणांनी नोटाचा वापर केला.
चार ठिकाणी समान मते मिळाल्याने चिठ्ठीने निकाल
जिल्हयात १८२ ग्रामपंचायतींसाठी मतदान झालेले असले, तरी शिंदखेडा तालुक्यात तीन व धुळे तालुक्यातील एका गावाच्या उमेदवारास समसमान मते मिळाल्याने, ईश्वर चिठ्ठीने निकाल काढण्यात आला. यात शिंदखेडा तालुक्यातील सोनशेलू, सुराय व नवे कोडदे येथील, तर धुळे तालुक्यातील लोणखेडी गावाचा समावेश आहे.