८ पिस्तूल घेऊन जाणाऱ्या पंजाब राज्यातील ३ संशयितांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 12:16 IST2020-12-22T12:16:31+5:302020-12-22T12:16:53+5:30
महाराष्ट्र मध्यप्रदेश सिमेभागात भल्या पहाटे कारवाई

८ पिस्तूल घेऊन जाणाऱ्या पंजाब राज्यातील ३ संशयितांना पकडले
शिरपूर - पंजाब येथील ३ संशयितांना मध्यप्रदेश महाराष्ट्र सिमेभागालगत ८ पिस्तूल, ६ जिवंत काडतूसे, १५ हजार रोख रक्कमसह ५ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ या तिनही संशयितांना अटक करण्यात आली़ ही कारवाई सांगवी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी त्यांच्या पथकासह मंगळवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास केली़
पंजाब राज्यातून काही संशयित हे अग्नीशस्त्र खरेदी करण्याच्या इराद्याने महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सिमेलगतच्या भागात आल्याची माहिती सांगवी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना प्राप्त झाली होती. लागलीच पथकातील नरेंद्र खैरनार, राजू सोनवणे, चत्तरसिंग खसावद, संजीव जाधव, पवन गवळी, इसरार फारुकी, संभाजी वळवी यांच्या पथकाने पहाटे ३ ते साडेतीन वाजेच्या सुमारास शोध घेण्यास सुरवात केली.
पोलीस पथकाने महाराष्ट्र मधप्रदेश सिमाभागातील वरला खंबाळे रोडवर गस्त व तपासणी करीत असतांना साडेतीन वाजेच्या सुमारास जोयदा गावापासून वरला बाजुकडे काही अंतरावर एक पंजाब पासिंगची एक कार येतांना दिसली. सदर कारचा संशय आल्याने कार थांबविण्यात आली़ या कारमध्ये बसलेल्या तिघांची कसून चौकशी केली असता त्यांच्या कडील काळ्या रंगाच्या बॅग मध्ये ८ देशी पिस्तूल व जिवंत काडतूसे मिळून आले. पकडलेल्या संशयितांमध्ये सुखविंदरसिंह प्रकाशसिंह शिख (२१ रा. बुलेरीयन ता. मलोट जि. मुखसर, पंजाब) लवदीपसिंह दलजितसिंह जाट (२३ रा़ कोटईशिका ता. धरमकोट जि. मोघा, पंजाब), दरजनसिंह बलविंदसिंह जाट (३०, रा. गुरुतेग बहादर नगर, ता. फरिदकोट, पंजाब) या तिघांचा समावेश आहे़ त्यांच्या चौकशीतून ८ पिस्तूल, ६ जिवंत काडतूसे, ३ मोबाईल व १५ हजार रोख व कार असा एकुण ५ लाख ३२ हजाराचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त करत तिघांना पोलिसांनी अटक केली आहे़
जप्त केलेले पिस्तूल हे वरला जि.बडवाणी मध्यप्रदेश येथून राजु नामक व्यक्तीकडुन खरेदी केले असून हे पिस्तुल पंजाब येथे स्वत: करीता तसेच मित्रांच्या स्वरक्षणार्थकरीता बाळगण्यासाठी नेणार असल्याचे संशयितांकडून सांगतात आले आहे.
पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील घटनेचा तपास करीत आहेत़