धुळे जिल्ह्यातील जि.प.च्या २६६ शाळा दुरूस्तीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 11:56 IST2020-08-07T11:55:44+5:302020-08-07T11:56:10+5:30
यावर्षी फक्त १९ शाळा दुरूस्तीला मिळाली मंजुरी

धुळे जिल्ह्यातील जि.प.च्या २६६ शाळा दुरूस्तीच्या प्रतीक्षेत
आॅनलाइन लोकमत
धुळे : गेल्या काही वर्षात इंग्रजी शाळांचे प्रस्थ वाढलेले आहे. चकाचक टोलेजंग इमारती, सुसज्ज मैदान याची अनेकांना भुरळ पडते. मात्र इंग्रजी माध्यमाचा शैक्षणिक खर्च पेलवत नसल्याने, ग्रामीण भागातील अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखल केले. परंतु जिल्ह्यातील काही जि.प. शाळांची अवस्था दयनीय झालेली आहे. गळके छत, तुटलेले दरवाजे, वर्ग खोल्यांमधील उखडलेली फरशी अशा अवस्थेतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसविणे म्हणजे शिक्षणापेक्षा शिक्षाच देण्याचा प्रकार आहे. धुळे जिल्ह्यातील२८५ शाळा नादुरूस्त असून, त्यापैकी यावर्षी १९ शाळा खोल्यांची दुरूस्ती झालेली आहे. अजुनही २६६ शाळा दुरूस्तीच्या प्रतिक्षेत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर यावर्षी शाळा अद्याप सुरू झालेल्या नाहीत. मात्र तत्पूर्वी शाळांची दुरूस्ती होणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ११०४ शाळा आहे. पहिली ते पाचवी व सहावी ते आठवी असे दोन्ही विभाग मिळून जवळपास ९० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात.ही गेल्यावर्षाची संख्या आहे. यावर्षीही शाळा सुरू झाल्यास तेवढीच संख्या राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा डिजीटल झालेल्या आहेत. विशेष म्हणजे सर्वच शाळांच्या भौतिक सुविधांकडे लक्ष देण्यात आलेले आहे. असे असले तरी काही शाळांची अवस्था दयनीय झालेली आहे. शाळेच्या चार-पाच खोल्या असल्या तरी त्यातील एक-दोन वर्गखोल्या खराब झालेल्या आहेत.
धुळे जिल्ह्यात जवळपास २८५ शाळा नादुरूस्त आहेत. त्यापैकी यावर्षी १९ शाळांच्या दुरूस्तीचे काम सुरू झालेले आहेत. त्यात धुळे तालुक्यातील ९, साक्री तालुक्यातील १, शिंदखेडा तालुक्यातील ३ व शिरपूर तालुक्यातील ७ शाळांचा समावेश आहे. त्यासाठी ७९ लाख ३१ हजार रूपये खर्च समग्र शिक्षा अभियानांतर्गत मंजूर झालेला आहे. दोन वर्षानंतर हा निधी मंजूर झाला असल्याचे सांगण्यात आले.
सर्वाधिक नादुरूस्त
शाळा साक्री तालुक्यात
जिल्ह्यात सर्वाधिक नादुरूस्त शाळा या साक्री तालुक्यात आहेत. या तालुक्यात १२६ शाळांची दयनीय अवस्था झालेली आहे. पैकी केवळ एका शाळेची यावर्षी दुरूस्ती सुरू झालेली आहे. तर १२५ शाळा अजुनही नादुरूस्त असल्याचे सांगण्यात आले.