न्यूमोकोकल कॉन्जुगेट लसीचे जिल्ह्यासाठी २६०० डोस उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:41 IST2021-07-14T04:41:30+5:302021-07-14T04:41:30+5:30

धुळे : न्युमोकोकल कॉन्जुगेट (पीसीव्ही) या लसीचा नियमित लसीकरणामध्ये समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात पहिल्या डोसचे २८ ...

2600 doses of pneumococcal conjugate vaccine available for the district | न्यूमोकोकल कॉन्जुगेट लसीचे जिल्ह्यासाठी २६०० डोस उपलब्ध

न्यूमोकोकल कॉन्जुगेट लसीचे जिल्ह्यासाठी २६०० डोस उपलब्ध

धुळे : न्युमोकोकल कॉन्जुगेट (पीसीव्ही) या लसीचा नियमित लसीकरणामध्ये समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात पहिल्या डोसचे २८ हजार ७५६ लाभार्थी अपेक्षित आहेत. सहा आठवडे, १४ आठवडे व नऊ महिने या वयात हे डोस दिले जातील. लसीकरणासाठी २ हजार ६०० डोस उपलब्ध झाले असून, त्याचा पात्र बालकांसाठी पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष पाटील, जिल्हा माता - बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रसन्न कुलकर्णी यांनी केले आहे.

जिल्हास्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्र, बोरकुंडअंतर्गत रानमळा येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नवले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तरन्नुम पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली पात्र लाभार्थ्यांना लस देऊन या मोहिमेचे उद‌्घाटन करण्यात आले.

सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना न्युमोकोकल कॉन्जुगेट लसीबाबबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. न्युमोकोकल कॉन्जुगेट लसीचा जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये पुरवठा करण्यात आलेला आहे.

रोग प्रतिकारशक्ती कमी असलेली मुले किंवा ज्यांना पूर्वी इन्फ्लुएन्झा अथवा श्वसन मार्गाचा इतर विषाणूचा संसर्ग झाला आहे, अशा बालकांना हा आजार होण्याची शक्यता असते. न्युमोकोकल कॉन्जुगेट लस ही सहा आठवडे व त्यापुढील वयाच्या अर्भकांचे न्युमोकोकल आजारापासून संरक्षण करते. ज्यामुळे त्यांना सर्वाधिक धोका असतो. ही लस गंभीर न्युमोकोकल आजार जसे न्युमोनिया मेनिजायटिस आणि सेप्टिसेमियापासून लहान मुलांचे संरक्षण करते. न्युमोकोकल कॉन्जुगेट सार्वत्रिक लसीकरण मोहिमेत केंद्र सरकारव्दारा सर्व शासकीय आरोग्य संस्था, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रातील लसीकरण सत्रात पात्र बालकांना ही लस मोफत दिली जाणार आहे.

संसर्गजन्य आजार

न्युमोकोकल आजार हा संसर्गजन्य असून, तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तिला खोकला किंवा शिंकताना संपर्कात आल्यामुळे पसरतो. त्यामुळे न्युमोकोकल आजार सामाजिक आरोग्य समस्या आहे. भारतात २०१०मध्ये सुमारे १ लाख ५ हजार बाल मृत्यू हे न्युमोनियाने झाल्याचा अंदाज आहे. पाच वर्षांच्या आतील मुले आणि विशेषकरून दोन वर्षांच्या आतील मुलांना हा आजार होण्याचा आणि त्यामुळे मृत्यूचा धोका सर्वात असतो.

Web Title: 2600 doses of pneumococcal conjugate vaccine available for the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.