आंबाडूक पाड्यावर २ लाखांचे स्पिरीट पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 22:39 IST2020-11-17T22:38:29+5:302020-11-17T22:39:14+5:30
सांगवी पोलिसांची धडक कारवाई

आंबाडूक पाड्यावर २ लाखांचे स्पिरीट पकडले
शिरपूर : तालुक्यातील गधडदेव हद्दीतील आंबाडूक पाड्यावर बनावट दारू तयार करण्यासाठी उपयोगात येणारे २ लाखाचे स्पिरीटचा साठा जप्त करण्यात आला़ दरम्यान, सांगवी पोलिसात २ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
सांगवी पोलिस ठाण्याचे सपोनि अभिषेक पाटील यांना १५ रोजी एका गुप्तदाराने आंबाडूक पाडयावरील बादशाह नाना पावरा याच्या घरात बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे स्पिरीटचा साठा असल्याची माहिती दिली़ त्यानुसार सपोनि पाटील यांच्यासह हवालदार लक्ष्मण गवळी, योगेश मोरे, शाम पावरा, गोविंदराव कोळी, सुनिता पवार यांच्या पथकाने छापा टाकण्यासाठी गेलेत़ मात्र पोलिस पथकाने गावाबाहेरच गाडी थांबवून पायी गेलेत़ पाड्याकडे पोलिस येत असल्याचे दिसतातच दोन जण पळू लागलेत़ त्यापैकी पोलिसांनी एकास पाठलाग करून पकडले़ ५० वर्षीय इसम केसराम हेंद्रया पावरा रा़आंबाडूक यास जेरबंद करून त्याचा साथीदार बादशाह नाना पावरा हा पळून गेला़
बादशाह याच्या घराची झडती पोलिसांनी घेतली असता बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे स्पिरीटचे ५ निळ्या प्लास्टीकच्या ड्रम प्रत्येकी २०० लिटर क्षमतेचे भरलेले असे एकूण १ हजार लिटर स्पिरीट मिळून आले़ सदर स्पिरीटची किंमत २ लाख ५ हजार रूपये आहे़
याबाबत सांगवी पोलिसात दोन्ही इसमाविरोधात मुंबई प्रोव्हीशन कायदा कलम ६५ ई प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे़