रुग्णालयात दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आतच १६ रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:38 IST2021-05-06T04:38:02+5:302021-05-06T04:38:02+5:30
धुळे - एप्रिल महिन्यात हिरे वैद्यकीय महाविद्यालयात ११३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात, रुग्णालयात दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आतच ...

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आतच १६ रुग्णांचा मृत्यू
धुळे - एप्रिल महिन्यात हिरे वैद्यकीय महाविद्यालयात ११३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात, रुग्णालयात दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आतच १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण उशिरा दाखल होत असल्याने, तसेच दुखणे अंगावर काढत असल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, आयसीयू व अन्य विभागात किती मृत्यू झाले याची माहिती मिळू शकली नाही.
जिल्ह्यात मागील काही दिवसांमध्ये बाधित रुग्णांची संख्या कमी होताना दिसून येत आहे. दैनंदिन बाधित रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे. मात्र, मृत्यूचे थैमान सुरूच आहे. अनेक रुग्ण दुखणे अंगावर काढतात. उन्हात फिरल्यामुळे ताप आला किंवा अन्य कारणांमुळे आजारी पडलो असे सांगतात. गावातील खाजगी डॉक्टरांकडून उपचार घेतात. मात्र, कोरोनाची चाचणी करीत नाहीत. ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यानंतर धावाधाव करतात. त्यामुळे लक्षणे दिसली त्याच दिवशी कोरोनाची चाचणी करावी व तात्काळ उपचार सुरू करावेत. असे केले तर दोन आठवड्यांत रुग्ण ठणठणीत बरा होतो. त्यामुळे दुखणे अंगावर काढू नका, असे आवाहन तज्ज्ञांकडून केले जात आहे.
आयसीयू व अन्य विभागांतील मृत्यूची नोंद नाही -
एप्रिल महिन्यात ११३ मृत्यू झाल्याची नोंद हिरे वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आली आहे. मृतांमध्ये व्याधीग्रस्त रुग्ण किती, तसेच वयोगटानुसार व तालुकानिहाय मृत्यू किती, आदी बाबींचे विश्लेषण करण्यात आले आहे. मात्र, आयसीयू, कॅज्युअल्टी आदी विभागांत किती मृत्यू झाले याबाबतची माहिती मिळू शकली नाही. एप्रिल महिन्यात ५० पेक्षा जास्त वयाच्या रुग्णांो अधिक मृत्यू झाले आहेत. ५१ ते ६० या वयोगटातील ४४, तर ६० पेक्षा जास्त वय असलेल्या ४१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तसेच ४१ ते ५० या वयोगटातील १५ रुग्णांचा मृतांमध्ये समावेश आहे.
प्रतिक्रिया -
लक्षणे जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. बरेच रुग्ण दुखणे अंगावर काढतात, त्यामुळे त्यांचा त्रास वाढत जातो. कोरोनाची लक्षणे जाणवत असतील, तर सर्वप्रथम कोरोनाची चाचणी करा व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्या. लवकर उपचार सुरू केल्यास १ ते २ आठवड्यांत रुग्ण बरा होतो. रुग्णालयात उशिरा दाखल झाल्याने मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे.
एप्रिलमधील आकडेवारी -
वयोगट - ३१ ते ४०
मृत्यू - ८
टक्केवारी - ७.०८
वयोगट - ४१ ते ५०
मृत्यू - १५
टक्केवारी - १३.२७
वयोगट - ५१ ते ६०
मृत्यू - ४४
टक्केवारी - ३८.९४
वयोगट - ६० पेक्षा अधिक
मृत्यू - ४१
टक्केवारी - ३६.२८