धुळयातील १३६ कोटींची पाणी योजना मनपाला डोईजड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 12:26 IST2017-12-10T12:25:46+5:302017-12-10T12:26:57+5:30
मनपा हतबल : ठेकेदाराला किती दंड आकारणी करू?- मजीप्राला विचारणा

धुळयातील १३६ कोटींची पाणी योजना मनपाला डोईजड!
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरात राबविण्यात येत असलेली १३६ कोटींची पाणी योजना मनपाला डोईजड ठरत असल्याचे दिसून येत आहे़ सातत्याने नोटीसा देऊनही कामाची गती, गुणवत्ता व नियोजनावरून हे काम मुदतीतही पूर्ण होण्याची शाश्वती मनपाला राहिलेली नाही़ त्यामुळे ठेकेदाराला किती दंड आकारायचा? असा प्रश्न मजीप्राला विचारण्यात आला असून त्यातून मनपा प्रशासनाची हतबलता दिसून येत आहे़
शहरात राबविण्यात येत असलेल्या १३६ कोटींच्या पाणी योजनेचे काम असमाधानकारक असल्याने मनपा आयुक्तांनी ठेकेदार आऱए़घुले यांना नोटीस बजावून १ आॅक्टोबरपासून ७ लाख ३५ हजार ४५० रूपये दररोज दंडआकारणीचा निर्णय घेतला होता़ सदर नोटीसीला ठेकेदाराने मुदतीत खुलासा केला नसून मुदतीनंतर केलेला खुलासा देखील समाधानकारक नाही़ त्यामुळे व्दिपक्षीय व त्रिपक्षीय करारानुसार ठेकेदाराला किती दंडाची आकारणी करायची, हे अवगत करावे, त्यानुसार मनपाकडून कार्यवाही केली जाईल, असे पत्र मनपा प्रशासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एस़सी़निकम यांना दिले आहे़