खैरखुटी जंगलातून पकडला १२०० लिटर स्पिरीटचा साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 21:59 IST2020-08-08T21:58:57+5:302020-08-08T21:59:21+5:30
सांगवी पोलिसांची धडक कारवाई। अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

खैरखुटी जंगलातून पकडला १२०० लिटर स्पिरीटचा साठा
पळासनेर : महाराष्ट्र - मध्यप्रदेश सीमेवर शिरपूर तालुक्यातील खैरखुटी वन परिसरात अडीच लाखांचे १ हजार २०० लिटर स्पिरीट छापा टाकून जप्त केले़ शुक्रवारी रात्री सांगवी पोलिसांनी ही कारवाई केली़ याप्रकरणी एकास अटक करण्यात आली़
बनावट दारु निर्मितीसाठी वापरलेले जाणारे मानवी आरोग्यास असे घातक स्पिरीट रसायनाची अवैध तस्करी शिरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर होते़ विशेषत: मध्यप्रदेश सिमा भागात बनावट दारु निर्मितीचा मोठा काळा धंदा फोफावला आहे़ त्यासाठी स्पिरीटची चोरटी वाहतुक आणि साठवणूक होत असते़ अशाच प्रकारे मध्यप्रदेश राज्यातील सेंधवा गावडी भागातून स्पिरीटची तस्करी करुन दारु बनविण्याकरीता उपयोगात आणली जात असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळाली़ त्यावरुन ७ आॅगस्ट रोजी रात्री पोलिसांच्या पथकासह अभिषेक पाटील यांनी शिरपूर तालुक्यातील खैरखुटी वन परिसरात छापा टाकला़ खैरखुटी वन क्षेत्रातील नाल्याच्या काठी एक इसम हा पोलिसांना पाहून पळून जात असताना दिसून आला़ सिनेस्टाईल पाठलाग करुन त्याला पकडण्यात आले़ त्याची विचारपूस आणि पोलिसी खाक्या दाखविताच त्याने काडी आणि मातीच्या झोपडीमध्ये स्पिरीटने भरलेले मोठे बॅरल ठेवल्याचे दाखविले़ या झोपडीत प्रत्येकी २०० लिटरचे ६ बॅरल मिळून आले़ २ लाख ४६ हजार रुपये किंमतीचे हे स्पिरीट पोलिसांनी जप्त केले़
याप्रकरणी पोलीस कर्मचारी योगेश दाभाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित श्यामू भगत (रा़ पळासनेर) याला मुद्देमालासह अटक करण्यात आली़ त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला़
ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील व त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक खैरनर, कर्मचारी लक्ष्मण गवळी, योगेश मोरे, श्याम पावरा तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या गस्ती पथकातील कर्मचारी अशोक पाटील, मयूर पाटील यांनी ही कारवाई केली़