जुलैत ११ वेळा ‘शून्य अहवाल पॉझिटिव्ह’ १ ते १७ जुलै : ८५ कोरोनामुक्त, ४२ रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:35 IST2021-07-29T04:35:43+5:302021-07-29T04:35:43+5:30
धुळे - जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. जुलै महिन्यात आतापर्यंत तब्बल ११ वेळा शून्य दैनंदिन बाधित रुग्णांची नोंद ...

जुलैत ११ वेळा ‘शून्य अहवाल पॉझिटिव्ह’ १ ते १७ जुलै : ८५ कोरोनामुक्त, ४२ रुग्ण आढळले
धुळे - जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. जुलै महिन्यात आतापर्यंत तब्बल ११ वेळा शून्य दैनंदिन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे.
१ ते २८ जुलै याकाळात ४२ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर ८५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आढळलेल्या कोरोना बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. मार्च, एप्रिल व मे महिन्यात कोरोनाची दुसरी लाटेने उच्चांक गाठला होता. या कालावधीत पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होती. पण त्यानंतर जून व जुलै महिन्यात बाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे.
४२ अहवाल पॉझिटिव्ह -
जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी पूर्णपणे संपलेली नाही. पॉझिटिव्हिटी दर कमी झाला आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव थांबलेला नाही. जुलै महिन्यात आतापर्यंत ४२ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. १० जुलै व १९ जुलै रोजी सर्वाधिक सहा अहवाल पॉझिटिव्ह आले होते.
८५ रुग्ण झाले बरे -
जुलैत आढळलेल्या कोरोना बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या दुप्पट आहे. १ ते २८ जुलै या कालावधीत आतापर्यंत ८५ रुग्ण बरे झाले आहेत. ७ जुलै रोजी सर्वाधिक १३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता.
केवळ आठ सक्रिय रुग्ण -
धुळे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या आठपर्यंत कमी झाली आहे. शिरपूर कोरोनामुक्त होणार पहिला तालुका ठरला आहे. धुळे शहरात चार सक्रिय रुग्ण आहेत. साक्री तालुक्यात दोन तर धुळे व शिंदखेडा तालुक्यात एका रुग्णावर उपचार सुरू आहेत.
वादळापूर्वीची शांतता ठरू नये -
पॉझिटिव्हिटी दर कमी झाला आहे. ही चांगली गोष्ट आहे. पण पॉझिटिव्हिटी दर नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे. कमी झालेली रुग्णसंख्या ही वादळापूर्वीची शांतता ठरू नये यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.
- डॉ. विशाल पाटील, जिल्हा कोरोना नोडल अधिकारी
कोरोना त्रिसूत्री पाळा
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला म्हणून बेजबाबदारपणे वागलात तर अंगलट येऊ शकते. रुग्णसंख्या कमी झाली असली तरी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची त्रिसूत्री पाळणे आवश्यक आहे.
- डॉ. दीपक शेजवळ, नोडल अधिकारी हिरे महाविद्यालय