कमानींवर ७० लाख़़़ कशासाठी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 22:25 IST2019-11-14T22:24:57+5:302019-11-14T22:25:22+5:30
महापालिका : स्थायी समितीच्या सभेत संतप्त सवाल, विरोध नोंदवून विषय मंजूर

कमानींवर ७० लाख़़़ कशासाठी?
धुळे : शहरात रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे़ रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत़ याच खड्ड्यांनी एका मुलाचा बळी देखील घेतलेला आहे़ जनतेचे हाल होत असताना शहरात स्वागत कमानी कसल्या उभारता? त्यासाठी तब्बल ७० लाख, कशासाठी? असा संतप्त सवाल नगरसेवक संतोष खताळ यांनी उपस्थित केला़ विरोध नोंदवून चर्चेअंती या विषयाला मंजुरी देण्यात आली़ कूपनलिकांच्या दुरुस्तीचे बील काढण्यावरुन देखील सदस्यांनी सुनावल्यानंतर अजेंड्यावरील दोन्ही विषय तहकूब करण्यात आले़
महापालिकेच्या सभागृहात स्थायी समितीची सभा पार पडली़ यावेळी स्थायी समिती सभापती युवराज पाटील, सहायक आयुक्त शांताराम गोसावी, नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह सदस्य, सदस्या आणि विभाग प्रमुख उपस्थित होते़
या सभेत महापालिकेअंतर्गत मोठ्या पुलावरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ प्रवेशद्वार उभारणीच्या ७० लाखांच्या खर्चाला आर्थिक आणि प्रशासकीय मान्यता देण्याचा विषय स्थायी समितीच्या सभेत मांडला गेला़ मात्र, स्वागत कमान म्हणजेच प्रवेशद्वार उभारायला नगरसेवक संतोष खताळ यांनी कडाडून विरोध केला़ धुळ्यात अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत़ महापालिका खड्डे बुजवित नाही़ अशाच खड्यामुळे मील परिसरात तरुणाचा बळी गेला आहे़ तसेच मुलभूत आणि आवश्यक त्या गोष्टी केल्या जात नाही़ ७० लाखांऐवजी ७ कोटी, ७० कोटी खर्च करा़ मात्र, त्याचा खरा उपयोग नागरीकांना झाला पाहीजे़ तर त्या निधीचा अर्थ आहे़ जनतेच्या उपयोगी येतील अशी कामे प्रामुख्याने झाली पाहीजे, असे सांगत नगरसेवक संतोष खताळ यांनी विरोध दर्शविला़ तर नगरसेवक अमिन पटेल यांनी शहरात अनेक विकासाची कामे पडलेली आहेत़ रस्ते नाहीत, आधी ती करावीत़ असे सांगत हा विषय तहकूब करावा अशी मागणी केली़ या अनुषंगाने नगरसेवक नागसेन बोरसे यांनी प्रवेशद्वार उभारणीच्या विषयाच्या अनुषंगाने स्वागत कमान ही सुंदर कल्पना आहे़ बाहेरुन गावात प्रवेश करणाºयांना धुळ्याची सुंदरता लक्षात येईल़ अर्थ संकल्पात या कामाची तरतूद करण्यात आलेली आहे़ केवळ प्रशासकीय मंजुरीसाठी हा विषय स्थायी समितीसमोर आलेला आहे़ त्यामुळे विरोध न करता हा विषय मंजूर होऊ द्यावा अशी मागणी त्यांनी केली़ यानंतर विरोधकांचा विरोध नोंदवून विषयाला मंजूरी देण्यात आली़
बोअरिंगची कामे कोणत्या गावात झाली आहेत? त्याची माहिती प्रशासनाने द्यावी़ वरखेडी गावात गेल्या सहा महिन्यांपासून हातपंप बंद पडलेले आहेत़ त्याची तक्रार देखील केलेली आहे़ मात्र, त्या तक्रारीची दखल घेऊन काम झालेले नाही़ मग काम नेमके कुठे झाले? वलवाडी, अवधान गावात बोअरिंगची कामे झालेली नाही़ मग, नेमके काम झाले कुठे? तसेच चितोड गावात एकही बोअरिंग सुरु नाही़ परिणामी विषय तहकूब करावा अशी मागणी नगरसेवक संजय भील, संतोष खताळ यांनी केली़ त्यामुळे दोन्ही विषय तहकूब करण्यात आले़
अर्धातास उशीर
स्थायी समितीची सभा सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली होती़ पण, हीच सभा सकाळी साडेअकरा वाजेला सुरुवात झाली़ तोपर्यंत सदस्यांसह अधिकारी सभागृहात उपस्थित होते़ त्यानंतर अर्धातासातच सभेचे कामकाज गुंडाळण्यात आले़