जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा बदलणार गणवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:29 IST2021-01-21T04:29:55+5:302021-01-21T04:29:55+5:30
उस्मानाबाद : जिल्हा परिषदेच्या तत्कालीन उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषद शाळांचा गणवेश बदलण्यात आला हाेता. परंतु, जे ...

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा बदलणार गणवेश
उस्मानाबाद : जिल्हा परिषदेच्या तत्कालीन उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषद शाळांचा गणवेश बदलण्यात आला हाेता. परंतु, जे रंग निश्चत करण्यात आले हाेते, ते कापड सहजरीत्या उपलब्ध हाेत नसल्याचे पालक, तसेच शाळांकडूनही बाेलले जात हाेते. ही बाब गांभीर्याने घेत विद्यमान उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या उपस्थितीत झालेल्या विषय समितीच्या बैठक विद्यार्थ्यांचा गणवेश बदण्याचा निर्णय झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शहरी, तसेच ग्रामीण भागात सुमारे एक हजारापेक्षा अधिक शाळा चालविल्या जातात. या शाळांतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा गणेश तत्कालीन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील यांच्या कार्यकाळात बदलण्यात आला हाेता. इंग्रजी शाळांप्रमाणे आपल्याही जि.प. शाळांतील मुलांचे गणवेश असावेत, असे त्यावेळी कारण देण्यात आले हाेते. त्यानुसार गणवेश पुरविण्यात आले. परंतु, संबंधित गणवेश सहजरीत्या उपलब्ध हाेत नसल्याने पालकांच्या नाकीनऊ येत असल्याची ओरड झाली हाेती. त्यामुळे पूर्वीचाच गणवेश लागू करावा, अशी मागणी पुढे आली हाेती. याच अनुषंगाने विषय समितीच्या बैठकीत चर्चा झाली. यावेळी सर्वानुमते मुलांसाठी खाकी पँट व पांढऱ्या रंगाचा शर्ट, तर मुलींसाठी चाॅकलेटी रंगाचे स्कर्ट आणि पांढऱ्या रंगाचा टाॅप हा गणवेश लागू करण्याचे ठरले. दरम्यान, उपाध्यक्ष सावंत यावेळी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना कपड्याच्या दर्जाबाबत काॅॅम्प्रमाईज खपवून घेतली जाणार नाही, अशी तंबी दिली. हा कपडा ‘बीआयएस’ने अप्रू केलेला असावा, असे त्यांनी सांगितले.
चाैकट...
‘सॅनिटाइज’वरून खरडपट्टी...
सध्या नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत. परंतु, अनेक शाळांकडून आवश्यक ती काळजी घेतली जात नाही. शाळा अधून-मधून सॅनिटाईज करण्यासाेबतच विद्यार्थ्यांचे नियमित तापमान तपासणे करजेचे आहे. याकडेही फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवरील यंत्रणा करते तरी काय? असा सवाल शिक्षणाधिकारी यांना केला. यापुढे हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, अशी तंबीही उपाध्यक्ष सावंत यांनी दिली.