पोलीस भरतीच्या नव्या निर्णयाचे तरुणांकडून स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:24 IST2021-01-13T05:24:40+5:302021-01-13T05:24:40+5:30

उस्मानाबाद : राज्यातील एसईबीसी आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाजातील तरुणांना खुल्या प्रवर्गात टाकण्याचा गृहविभागाने काढलेला आदेश रद्द करण्याचा निर्णय ...

Young people welcome new decision on police recruitment | पोलीस भरतीच्या नव्या निर्णयाचे तरुणांकडून स्वागत

पोलीस भरतीच्या नव्या निर्णयाचे तरुणांकडून स्वागत

उस्मानाबाद : राज्यातील एसईबीसी आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाजातील तरुणांना खुल्या प्रवर्गात टाकण्याचा गृहविभागाने काढलेला आदेश रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भरतीप्रक्रिया लवकर राबविण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. या निर्णयाचे तरुणांनी स्वागत केले आहे.

मागील तीन-चार वर्षांपासून पोलीस भरतीसाठी अथक परिश्रम घेणाऱ्या तरुणांना पोलीस भरतीचा जीआर रद्द झाल्याने तरुणांचा हिरमोड झाला होता. भरतीसंदर्भात उलटसुलट चर्चाही सुरू होत्या. तयारी करणाऱ्या तरुण, तरुणींमधून नाराजीचा सूर उमटत होता. ही बाब लक्षात घेऊन गृहविभागने हा आदेश रद्द करण्याची घोषणा केली आहे. शिवाय, राज्यात जवळपास १२ हजार पदांकरिता पोलीस भरती राबविण्यात येणार आहे. त्यात पहिल्या टप्प्यात ५ हजार २९५ पदांसाठी भरती होणार आहे. त्यामुळे तरुणांमधून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

मागील तीन वर्षांपासून तरुण पोलीस भरतीची तयारी करीत आहेत. भरतीसंदर्भात घोषणा झाल्याने त्यांना आनंद झाला होता. मात्र भरतीचा जीआर रद्द करण्यात आल्याने आशेवर पाणी फेरले होते. मात्र, भरतीची तयारी सुरू ठेवली आहे. शासनाने भरतीची घोषणा केली आहे. त्याप्रमाणे भरतीची प्रक्रियाही लवकर राबवावी.

बालाजी औंटी, वाडी बामणी, ता. उस्मानाबाद

पदवीपर्यंत शिक्षण घेऊन कमी वेळेत नोकरी मिळविण्यासाठी पोलीस भरतीकडे वळलो. तीन वर्षांपासून भरतीची तयारी उस्मानाबाद शहरात करत होतो. भरती होईल, असे वाटत असतानाच पुन्हा भरती लांबवणीवर पडली होती. शासनाने भरती होणार असल्याचे जाहीर केल्याने उत्साह वाढला आहे.

सचिन रोहिले, खामसवाडी, ता. कळंब

पोलीस भरतीबाबतचा जीआर निघाला होता. त्यानुसार तरुण मैदानावर सराव करीत होते. मात्र, न्यायालयाच्या निर्णयानंतर अध्यादेश थांबविण्यात आला होता. त्यामुळे तरुणांत नाराजी होती. शासनाने भरतीप्रक्रिया राबविणार असल्याची घोषणा केल्याने आशा पल्लवित झाल्या आहेत.

अजय गायकवाड,

साैंदणा अंबा, ता. कळंब

९२० नागरिकांमागे केवळ १ पोलीस

उस्मानाबाद जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास १६ लाख ५७ हजार एवढी आहे. पोलिसांची संख्या जवळपास १ हजार ८०० इतकी आहे. यात १०० अधिकाऱ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात ८ तालुके असून पोलीस कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता आहे. विशेष म्हणजे, ९२० नागरिकांमागे १ पोलीस कर्मचारी आहे.

Web Title: Young people welcome new decision on police recruitment