एसटीत ३० टक्के उपस्थितीत कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:33 IST2021-05-10T04:33:06+5:302021-05-10T04:33:06+5:30
उस्मानाबाद : कोरोनामुळे एसटी महामंडळाला मोठा फटका बसत आहे. जवळपास दोन हजारांवर कर्मचारी उस्मानाबाद जिल्ह्यातील सहा आगारात आहेत. शासनाच्या ...

एसटीत ३० टक्के उपस्थितीत कामकाज
उस्मानाबाद : कोरोनामुळे एसटी महामंडळाला मोठा फटका बसत आहे. जवळपास दोन हजारांवर कर्मचारी उस्मानाबाद जिल्ह्यातील सहा आगारात आहेत. शासनाच्या आदेशानुसार चालक-वाहकांची १५ टक्के उपस्थिती आहे, तर यांत्रिकी विभाग व प्रशासकीय विभागात ३० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थित काम चालू आहे.
कोेरोनाच्या वाढत्या संसर्गास प्रतिबंध बसावा, यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे एसटीच्या फेऱ्या बंद आहेत. त्याचा महामंडळाला फटका बसत आहे. मागील वर्षीपासून एसटीच्या उत्पन्नाला ग्रहण लागले आहे. कर्मचाऱ्यांचा पगार कसा करायचा, हा मोठा प्रश्न व्यवस्थापनासमोर निर्माण झाला आहे. एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे एसटीची चाके रुतल्याने हे महामंडळ प्रचंड अडचणीत सापडले आहे. वाहनात तांत्रिक बिघाड झाल्यास मेकॅनिकल विभागातील कुशल कामगारांना बालवावेच लागत आहे. त्यामुळे यांत्रिक विभाग व प्रशासकीय विभागात ३० ते ५० टक्के, तर वाहक व चालकांसाठी १५ टक्के उपस्थितीचा नियम असून, बसेस सुरू नसल्याने चालकांना स्वाक्षरीसाठी बोलाविले जात आहे. त्याची उपस्थिती १५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. बससेवा बंद असल्यामुळे एसटीला प्रतिदिन ५० लाख रुपयांचा फटका बसत आहे.
जिल्ह्यातील एकूण
चालक - १०५०
वाहक ९५०
अधिकारी १४
यांत्रिकी कर्मचारी ३७५
प्रशासकीय अधिकारी १८
वाहक-चालक महिनाभरापासून घरीच
राज्य शासनाने संचारबंदी जाहीर करताना अत्यावश्यक सेवा म्हणून बसचा वापर करण्याचा आदेश दिला आहे. मात्र, जिल्ह्यातील सहाही आगारात अत्यावश्यक सेवेला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे महिनाभरापासून वाहक-चालक घरीच आहेत.
शासनाने एसटीला शासकीय, निमशासकीय कर्मचारी तसेच दुर्धर आजार, लग्न, निधन अशा कामासाठी प्रवाशांना एसटीतून प्रवासासाठी मुभा दिली आहे. मात्र, संचारबंदीमुळे प्रवासी बसकडे फिरकत नाहीत. त्यामुळे बस डेपोतच थांबून राहते.
चालक
१५ टक्के कर्मचारी उपस्थिती आदेशानुसार वाहक व चालक कर्तव्यावर उपस्थित राहण्यास तयार आहेत. मात्र मागील महिन्याभरापासून बससेवा बंद असल्यामुळे घरीच थांबावे लागत आहे.
वाहक
शासनाने वाहक व चालकांना १५ टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे. तसेच यांत्रिकी व प्रशासकीय विभागातील ५० टक्के कर्मचाऱ्यांना उपस्थिती ठेवण्याचा आदेश आहे. सध्या प्रवासी नसल्याने बसेस बंद आहेत. त्यामुळे यांत्रिकी व प्रशासकीय विभागात गरजेनुसार म्हणजेच ३० ते ५० टक्के कर्मचारी उपस्थित राहत आहेत तर बसेस सुरू नसल्याने वाहक-चालकांची १५ टक्केही उपस्थिती नाही.
ए.एम. पाटील,
आगारप्रमुख, उस्मानाबाद